पोर्तुगिजांचे गोव्यातील प्रवक्ते !
पोर्तुगिजांनंतर आता गोवा त्यांच्या वंशजांपासूनही मुक्त करण्याची वेळ !
कुठल्याही राष्ट्रासाठी पारतंत्र्याच्या जखमा या सर्वाधिक वेदनादायी असतात. त्यातून शिकून तशी परिस्थिती पुन्हा ओढवू नये, यासाठी कटीबद्ध रहाणे, हे प्रत्येक राष्ट्राचे आणि तेथील नागरिकांचे कर्तव्य असते. एवढेच नव्हे, तर पारतंत्र्याच्या खाणाखुणा पुसून टाकणेही आवश्यक असते. भारतात मात्र याच्या उलट चित्र दिसून येते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. त्यानुसार पोर्तुगिजांनी उद़्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे कार्य गोवा सरकारने हाती घेतले आहे. यामुळे पोटशूळ उठलेले काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी ‘पोर्तुगिजांनी उद़्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सरकारचे नव्हे’, असे विधान करून पोर्तुगिजांच्या प्रवक्त्याची भूमिका चोखपणे बजावली आहे. यासह सार्दिन यांनी ‘पोर्तुगीज या भूमीतून गेल्यानंतर त्यांनी केलेल्या वाईट गोष्टी संपुष्टात आलेल्या असून ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या, त्या गोमंतकीय संस्कृतीत मिसळून गेल्या आहेत आणि ती आता गोमंतकियांची संस्कृती बनली आहे’, असेही विधान केले आहे. सार्दिन यांचे विधान देशातील १०० कोटी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे, तसेच गोवामुक्ती संग्रामात प्राणार्पण केलेल्या स्वातंत्र्यसेनानींचा हा घोर अवमान आहे. सार्दिन यांना गोव्यात पुन्हा हिंदूंची मंदिरे उभी राहिलेली नको आहेत. त्यांना ‘पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर केलेले पाशवी अत्याचार गोमंतकियांनी विसरावेत’, असे वाटते; म्हणूनच ते पोर्तुगिजांची प्रवक्तेगिरी चोखपणे बजावत आहेत. हा त्यांचा पोर्तुगीजधार्जिणेपणा आहेच; पण हिंदुद्वेषही आहे. वास्तविक काँग्रेसच्या नेत्यांकडून दुसरी अपेक्षाही करणे चूकीचे आहे. असे असले, तरी सार्दिन यांनी ‘पोर्तुगिजांनी मंदिरे उद़्ध्वस्त केली आहेत’, हे अप्रत्यक्षपणे का होईना; पण मान्य केले आहे.
पोर्तुगिजांकडून हिंदूंवर प्रचंड अत्याचार !
बहुतांश भारतियांना केवळ मोगल आणि इंग्रज यांच्या राजवटींतील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयीच माहिती आहे; परंतु त्याहीपेक्षा भयंकर अत्याचार पोर्तुगिजांच्या राजवटीत हिंदूंवर करण्यात आले, हे पुष्कळ अल्प हिंदूंना ठाऊक आहे. काँग्रेसने हा इतिहासच दडपला. पोर्तुगिजांनी गोव्यात तब्बल ४५० वर्षे राज्य केले. ते काही गोव्याचा किंवा भारताचा विकास करायला आले नव्हते, तर भारतावर राज्य करून त्यांना भारत लुटायचा होता. एवढ्यावरही ते थांबले नाहीत, तर त्यांनी येथील हिंदु संस्कृती उद़्ध्वस्त करण्यासाठी जीवाचे रान केले, किंबहुना त्याचसाठी सत्तेचा वापर केला. पोर्तुगिजांनी हिंदूंची लाखो मंदिरे पाडून मोठमोठे चर्च बांधले, मंदिरांतील असंख्य मूर्ती फोडल्या, लाखो हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले, हिंदु पुरुषांना गुलाम बनवले, तर हिंदु स्त्रियांची अब्रू लुटली. या सर्वांमध्ये अंगावर काटा आणणारा प्रकार होता तो हिंदूंच्या ‘इन्क्विझिशन’चा (धर्मच्छळाचा) ! बलपूर्वक धर्मांतर केलेले हिंदू धर्मांतरानंतरही ख्रिस्ती पंथाचे पालन करत नव्हते, अशांना दिल्या जाणार्या शिक्षेला ‘इन्क्विझिशन’ म्हणतात. पोर्तुगिजांच्या राजवटीतील हिंदूंवरील अत्याचारांची सविस्तर आणि थरकाप उडवणारी माहिती गोवा स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांनी त्यांच्या ‘पोर्तुगीज इंडिया’ आणि ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोेवन्स’ या दोन पुस्तकांत विस्तृतपणे दिली आहे. ही दोन पुस्तके प्रत्येक हिंदूने आवर्जून वाचली पाहिजेत, जेणेकरून त्यांना पोर्तुगिजांचा हिंदुद्वेषी इतिहास समजेल; कारण हाच इतिहास दडपण्याचे काम सार्दिन यांच्यासारख्या प्रवृत्ती करत आहेत.
ख्रिस्ती धर्मगुरूंचा पोर्तुगीजधार्जिणेपणा !
पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा पुसण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या घोषणेवर गोव्यातील फादर व्हिक्टर फेर्राव यांचा लेखही एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. ‘पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा पुसण्याची, तसेच ‘आपली संस्कृती’ आणि ‘त्यांची संस्कृती’ असा भेद करण्याची वेळ केव्हाच गेली आहे’, असा
त्यांच्या लेखाचा आशय आहे. यावरून ‘फेर्राव यांना पोर्तुगिजांची अत्याचारी राजवट आजही प्रिय आहे आणि तिच्या पाऊलखुणा पुसू नयेत, असे अगदी मनापासून वाटते’, हे स्पष्ट होते. फेर्राव ज्या पोर्तुगिजांची तळी उचलत आहेत, त्या पोर्तुगालनेसुद्धा स्पेनच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर स्पेनमधील स्पॅनिश खाणाखुणा पार पुसून टाकल्या होत्या, हे लक्षात घेतले पाहिजे. फेर्राव यांचा इतिहास कच्चा असल्याने किंबहुना त्यांना तो ठाऊक असला, तरी तो त्यांच्यासाठी अडचणीचा असल्याने ते याविषयी कदापि वाच्यता करणार नाहीत.
अशा प्रकारे इतिहास दडपून फेर्राव काय साध्य करू पहात आहेत ?
पोर्तुगिजांची प्रवक्तेगिरी करण्याची स्वयंघोषित मक्तेदारी केवळ सार्दिन आणि फेर्राव यांनीच घेतली आहे, असे नाही, तर गोव्यातीलच आणखी एक फादर सुकुर मेंदीश हेही त्यात मागे नाहीत. मेंदीश यांनी पोर्तुगिजांचे गुणगान गातांना ‘पोर्तुगीज अन्य युरोपियन साम्राज्यवाद्यांप्रमाणे नव्हते. ते प्रेम घेऊन गोव्यात आले आणि प्रेम देऊन गेले. त्यांनी आम्हाला संस्कार देऊन आम्हा गोमंतकियांना चांगले नागरिक बनवले’, असे धडधडीत खोटे विधान केले. थोडक्यात ज्याप्रमाणे इंग्रजांनी भारत सोडतांना काँग्रेसच्या रूपात स्वतःचे अस्तित्व भारतात कायम ठेवले, तसेच पोर्तुगिजांनी अशा प्रवृत्तींच्या रूपाने त्यांचे अस्तित्व आजही गोव्यात कायम ठेवले आहे. जे फ्रान्सिस सार्दिन यांना म्हणायचे आहे, तेच वेगळ्या शब्दांत फादर फेर्राव आणि मेंदीश यांनी म्हटलेले आहे. विशेष म्हणजे हे सर्व जण ख्रिस्ती आहेत, याला योगायोग कसे म्हणता येईल ? सार्दिन, फेर्राव आणि मेंदीश या तिघांचीही विधाने समस्त गोमंतकियांचा आणि गोवामुक्ती संग्रामात प्राणांची आहुती देणार्या स्वातंत्र्यसेनानींचा घोर अवमान आहे. येत्या काळात अशांना गोमंतकीय जनताच त्यांची जागा दाखवल्याविना रहाणार नाही !