मॉरिशसमध्ये १४ फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण !
मॉरिशस – महाराष्ट्रापासून अनुमाने ५ सहस्र कि.मी. दूर सातासमुद्रापार आणि हिंद महासागराचा तारा मानला जाणार्या मॉरिशस देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० वा राज्याभिषेकदिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले. सहस्रो मराठी बांधवांनी हा अविस्मरणीय क्षण ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. आयटी पार्क हिंजवडी परिसरातील उद्योगपती आणि मारुंजी गावचे सुपुत्र विठ्ठल चव्हाण यांनी १४ फूट उंचीचा महाराजांचा अश्वारुढ पुतळा मॉरिशसला दिला असून ब्रिटिशांनी मॉरिशस बेटाच्या ज्या ‘ब्लॅक रिव्हर’ परिसरात मराठ्यांना फ्रेंच्यांच्या कह्यात दिले होते त्याच गणेश मंदिर परिसरात राजांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. मॉरिशसचे उपराष्ट्रपती मारी शिरील एडीबॉयसेजन यांच्या हस्ते या अश्वारुढ पुतळ्याचे राज्याभिषेकदिनाला अनावरण झाले.
मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली मॉरिशस मराठी मंडळ सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पुतलाजी यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच पुतलाजी आणि पुणे येथील आंतरराष्ट्रीय कीर्तनकार शिवभूषण ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे यांच्या संकल्पनेतून हा सोहळा संपन्न झाला, या सोहळ्याला बडोद्यातील उज्ज्वलसिंह राजे गायकवाड सरकार, सांगलीतील शाहीर प्रसाद विभुते आणि उपस्थित अन्य २० खास पाहुण्यांनी मॉरिशसमधील या अनोख्या सोहळ्यात महाराष्ट्र देशाची महती विविध कला-गुणांच्या माध्यमातून सांगितली.