पुणे येथे कुलुपबंद शाळेमुळे वारकर्यांच्या मुक्कामाचे हाल !
पुणे – कुलुपबंद शाळेमुळे अनेक वारकर्यांना स्वत:ची पथारी (बिछाना) सकाळी वाहनतळाच्या जागेत टाकावी लागली. ती जागा अपुरी असल्याने त्यांना मग शाळेकडे येणार्या रस्त्यावरच पथारी टाकून बसावे लागले आहे. शाळा कुलुपबंद आणि त्यांची चावी कुणाकडे तेच माहिती नाही, असा हा प्रकार होऊनही त्याची कुणी नोंदच घेतलेली नव्हती. भवानी पेठ, रामोशी गेट जवळच्या सावित्रीबाई फुले प्रशालेत हा प्रकार झाला. (याला उत्तरदायी असणार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. – संपादक)
काही दिवसांपूर्वी भवानी पेठेत मोठी आग लागली होती. ज्यात नेहमी वारकरी मुक्काम करत असत त्या रफी अहमद किडवाई शाळेची बरीच हानी झाली. तेथील वर्गखोल्या खराब झाल्या आहेत. याच शाळेत वारकर्यांचा नेहमी मुक्काम होत असतो; मात्र ती खराब असल्याने सावित्रीबाई फुले प्रशालेत वारकर्यांना बोलावण्यात आले; मात्र तिथे शाळाच कुलुपबंद होती. वारकर्यांना त्यांचे साहित्य वाहनतळाच्या जागेत ठेवण्यास सांगण्यात आले.