पाऊले चालती पंढरीची वाट
१. ज्येष्ठ मासापासून वारकर्यांना पंढरीच्या वारीला जाण्याचे वेध लागत असणे
‘ज्येष्ठ मास आला की, वारकर्यांना पंढरीचे वेध लागतात. ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून संतश्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूर येथे जाण्यासाठी निघते. वारकरी १५ ते २० दिवस पालखीच्या समवेत असतात. त्या आधी ते घरातील आणि शेतीची सर्व कामे आटपून वारीची सिद्धता करत असतात.
२. महाविद्यालयाच्या सेवेतून मुक्त झाल्यावर पंढरपूर येथे जाणार्या नावाजलेल्या दिंडीत नावनोंदणी करणे
मलाही बरेच दिवसांपासून पालखीसमवेत चालत पंढरपूर येथे जाण्याची इच्छा होती; पण त्याच सुमारास माझी महाविद्यालयात नोकरी चालू होती. त्यामुळे मला १५ दिवसांची सुटी मिळत नसे. मी यथावकाश महाविद्यालयाच्या सेवेतून मुक्त झालो. तेव्हा मी ठरवले, ‘पालखीसमवेत पंढरपूर येथे जायचे.’ माझ्या समवेत काही मित्र होते. आम्ही सर्वांनी एका नावाजलेल्या दिंडीत नावनोंदणी केली. त्या दिंडीत जेवणखाण-चहापाणी इत्यादी सर्व सोयी होत्या. ‘आपल्याला चालवेल तेवढे चालायचे. आपल्याला दमायला झाल्यास काही वेळ ‘ट्रक’मध्ये बसायचे’, अशीही सोय होती. आम्ही ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदी येथे पोचलो. तेथूनच पंढरीच्या वारीचा आरंभ होणार होता.
३. संत तुकाराम महाराज यांनी वर्णिलेले पंढरीची वारी करण्याचे महत्त्व
वारकरी संप्रदायात आषाढी वारीला महत्त्वाचे स्थान आहे. सर्व संत वारकरी होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘होय होय वारकरी । जाय जाय तूं पंढरी ।’ या वारीला कशासाठी जायचे ? वारी ही सामूहिक (समष्टी) साधना आहे. त्यात संयम आणि शिस्त शिकायला मिळते, अहंकाराचा नाश होतो आणि परमार्थातील प्रगतीला गती मिळते.
‘उठाउठी अभिमान ।
जाय ऐसे स्थळ कोण ॥
ते या पंढरीसी घडे ।
खळां पाझर रोकडे ॥’
– संत तुकाराम महाराज
अर्थ : संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘मनुष्याचा अभिमान तात्काळ निघून जाईल, असे या जगात कोणते क्षेत्र असेल, तर ते ‘पंढरपूर’ होय. एखादा दुर्जन जरी पंढरीला गेला, तरी तेथील संत सत्संगाने त्याच्याही मनाला प्रेमाचा पाझर फुटून त्याच्यात भावभक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य पंढरीत आहे.’’
पंढरीच्या वारीचा आणखी एक मोठा लाभ, म्हणजे भक्तवत्सल पांडुरंगाचे दर्शन ! तेथे दिनांचा सोयरा कटीवर हात ठेवून युगे अठ्ठावीस भक्तांची वाट पहात विटेवर उभा आहे. ‘पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दिनांचा सोयरा पांडुरंग ॥ म्हणजे येथे जन्माला आलेल्या प्रत्येकाने पंढरीला जावे, तेथे दिनांचा सखा पांडुरंग भक्तांसाठी उभा आहे.
असे भक्ताचे हृदय घेऊन तुम्ही पंढरीला गेलात, तर यात्रेचा अवर्णनीय आनंद तुम्हाला निश्चित मिळेल.
ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीत माणसांचा महासागर लोटलेला असतो. ज्येष्ठ वद्य प्रतिपदेपासूनच सर्व दिंड्या आळंदीत दाखल होतात.’
– डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर, पुणे (साभार : मासिक ‘आदिमाता’, जुलै २००५)