भ्रष्टाचारी जाहले उदंड !
नुकतेच पुणे विभागाचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना ८ लाख रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. त्यांच्या घराच्या झडतीत ६ कोटी रुपये आणि १४ बेहिशेबी मालमत्तांची कागदपत्रे सापडली. त्यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. याकरता केवळ कायदे बनवून उपयोग नाही, तर समाजाची लोभी मानसिकता पालटण्याची आवश्यकता आहे. अन्यथा राजकीय घोषणांप्रमाणेच ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ हे दिवास्वप्नच राहील.
गेल्या साडेचार वर्षांमध्ये राज्यात भ्रष्टाचाराची ३ सहस्र ४०७ प्रकरणे उजेडात आली आहेत. त्यामध्ये ४ सहस्र ६९४ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत; मात्र त्यांतील केवळ १२५ प्रकरणांतील १५७ लाचखोरांना शिक्षा झाल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण हे न्यून आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये ‘प्रथम श्रेणी’ (क्लास वन) अधिकारी २५, ‘द्वितीय’ आणि ‘तृतीय’ श्रेणीतील १३२ कर्मचारी आहेत.
मध्यंतरी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना ‘तलाठ्यापासून ते वर्ग एकच्या अधिकार्यांपर्यंत कोणत्या कामासाठी, कोणत्या दराने लाच घेतली जाते’, याचे दरपत्रकच सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केले होते. प्रत्यक्षामध्ये गुन्हा नोंद होणे, आरोपपत्र प्रविष्ट होणे, खटल्यासाठी अनुमती न मिळणे, खटल्यांची सुनावणी लांबणे, साक्षीदारांच्या फितुरीचे प्रमाण वाढणे आदी गुन्हा सिद्ध होण्यातील अडथळे आहेत, असे तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या अभियोग (खटला चालवण्यासाठी) पूर्वसंमतीसाठीची २८२ प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. त्यांतील शासनाकडे १०८, तर सक्षम अधिकार्यांकडे १७४ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांतील ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधी संपल्याची २०६, तर ९० दिवसांपेक्षा अल्प दिवस असल्याची ७६ प्रकरणे प्रलंबित आहेत.
आपण सर्वच जण ‘भ्रष्टाचारमुक्त भारता’चे स्वप्न पहात आहोत; प्रत्यक्षात हा भ्रष्टाचार पुष्कळ खोल रुजलेला दिसून येत आहे. नोकरशहा, राजकारणी आणि गुन्हेगार यांच्यातील दुवा हेच भ्रष्टाचाराचे कारण आहे. सध्या कोणतेही साधे सरकारी काम लाच दिल्याविना होतांना दिसून येत नाही आणि असा अनुभव प्रत्येक भारतियाला कुठे ना कुठे येतो. भ्रष्टाचार संपवायचे सध्याचे प्रयत्न हे अगदी वरवरचे आहेत. खरा भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर प्रत्येक भारतियाला धर्माचे शिक्षण देणे आवश्यक आहे; कारण त्यामुळे मनुष्य नीतीमान, सुसंस्कारी, निर्माेही आणि समाधानी बनतो !
– श्री. अमोल चोथे, पुणे