छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील परिचारिकांचे वेतनवाढीसाठी आंदोलन !
वेतनवाढ न केल्यास राज्यभर ‘कामबंद’ आंदोलनाची चेतावणी !
छत्रपती संभाजीनगर – येथील घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी १३ जून या दिवशी आंदोलन केले. बक्षी समितीने ‘स्टाफ नर्स आणि इन्चार्ज सिस्टर’ यांना सुधारित वेतन श्रेणीतून वगळण्यात आले आहे. परिचारिकांना सुधारित वेतनवाढीतून वगळल्यामुळे राज्यात परिचारिका संतप्त वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ‘महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन’च्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. ‘राज्यातील परिचारिकांमध्ये संताप असून आमचा प्रश्न न सोडवल्यास राज्यभर बेमुदत आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी संघटनेच्या राज्याध्यक्ष इंदुमती थोरात यांनी दिली आहे.
या आंदोलनात परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ‘परिचारिकांना सुधारित वेतनश्रेणी वाढवून मिळालीच पाहिजे’, अशी मागणी ‘महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन’च्या वतीने करण्यात आली आहे. बक्षी समितीच्या अहवालात परिचारिकांच्या वेतनवाढीसाठी नोंद घेतली नाही. केवळ अधिसेविका, बालरुग्ण आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिकांची नोंद घेतली आहे; मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांची वेतनवाढीसाठी नोंद घेण्यात आलेली नाही.