८५० रुपयांचे कापसाचे बियाणे तब्बल २ सहस्र ३०० रुपयांना विकून शेतकर्यांची फसवणूक चालू !
कृषीमंत्री अब्दुल सत्तार त्यांच्या जिल्ह्यातील अपप्रकार कसा खपवून घेतात ?
छत्रपती संभाजीनगर – राज्यात बनावट बियाणे आणि वाढीव दराने त्यांची विक्री करणार्या लोकांविरोधात धाडसत्र चालू आहे. शेतकर्यांची फसवणूक करणार्या लोकांना सोडणार नाही, अशी भूमिका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केली आहे; मात्र त्यांच्याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकर्यांची फसवणूक चालू आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत ८५० रुपयांची कापसाची पिशवी (बॅग) १ सहस्र २५० ते २ सहस्र ३०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. हा सर्व अपप्रकार एका वृत्तवाहिनीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून समोर आला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात हा सर्व प्रकार चालू असून याची सर्वत्र चर्चा चालू झाली आहे.
जळगाव: चोपड्यात बनावट कपाशी बियाणे, तर धऱणगावात रासायनिक खतांचा साठा जप्त#nashik https://t.co/qG8OZXre9i
— LoksattaLive (@LoksattaLive) May 25, 2023
या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने पैठण येथील कोर्ट रस्त्यावरील एका कृषी दुकानात जाऊन कापसाच्या बियाण्यांची विचारपूस केली. ज्यात ‘कब्बडी’ नावाच्या वाणाविषयी विचारले असता त्याची किंमत १ सहस्र २५० रुपये सांगण्यात आली. ‘मला १ सहस्र २०० रुपयांना मिळत असून त्यात मला ५० रुपये मिळतात’, असेही दुकानदाराने सांगितले. विशेष म्हणजे सरकारने सर्व प्रकारच्या कापसाच्या बियाणांच्या पिशवीचे मूल्य ८५३ रुपये निश्चित केले आहे. पाचोड ग्रामपंचायत गाळ्यात असलेल्या एका कृषी दुकानात संकेत नावाच्या कापसाच्या बियाणांच्या पिशवीची मागणी केली. या वेळी त्याची किंमत तब्बल २ सहस्र ३०० रुपये सांगण्यात आली. विशेष म्हणजे ‘आज पैसे देऊन ‘बुक’ केल्यावर उद्या बियाणे मिळतील. या बियाण्यांचे पक्के देयक मिळणार नाही’, असे स्पष्ट सांगण्यात आले. पाचोड येथील आणखी एका दुकानात असलेल्या तरुणाला ‘कब्बडी’ नावाच्या बियाण्याविषयी विचारले असता त्याने १ सहस्र २०० रुपये मूल्य सांगितले. विशेष म्हणजे त्याच्यासमवेत आणखी दुसरे बियाणे घेणेही बंधनकारक असल्याचे सांगितले.
एकीकडे ८५३ रुपयांचे कापसाचे बियाणे २ सहस्र ३०० रुपयांना विकले जात आहे. महागात मिळणार्या या बियाणासमवेत इतर बियाणे घेणेही बंधनकारक आहे. इतर बियाणे घेतल्यावरच ‘कब्बडी’ आणि ‘संकेत’ नावाचे वाण शेतकर्यांना विकत मिळते. त्यामुळे शेतकर्यांची होणारी फसवणूक कधी थांबणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषीमंत्री यांच्याच जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल, तर राज्यात काय चित्र असेल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संपादकीय भूमिका :
|