छत्रपती संभाजीनगर येथील ‘दामिनी पथका’कडे १२ दिवसांत २२ तक्रारी !
पोलिसांनी स्वतःहून अशांवर कारवाई करणे अपेक्षित आहे !
छत्रपती संभाजीनगर – शाळा-महाविद्यालये येथील विद्यार्थिनी, युवती आणि महिला यांच्या अडचणी जाणून घेणे, तसेच रोडरोमियोंकडून होणारा त्रास अल्प करण्यासाठी वर्ष २०१७ मध्ये ‘दामिनी पथक’ स्थापन केले होते. या पथकाकडे दिवसातून किमान ३ ते ५ तक्रारी प्राप्त होतात. विशेष म्हणजे महिला आणि मुली यांना होणार्या त्रासापासून सुटका हवी असते; मात्र अपर्कीती होईल या भीतीने त्रास देणार्याच्या विरोधात तक्रार देण्याचे धैर्य त्या करत नाहीत. यातूनच गुन्हेगारांना बळ मिळते. अनेक गंभीर प्रकरणांमध्ये पीडितांकडून तक्रार देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. त्यामुळे २२ तक्रारी प्राप्त होऊनही एकाही प्रकरणात गुन्हा नोंद झाला नाही. (पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंद करून छेड काढणार्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. समाजहित लक्षात घेऊन असे का होत नाही ? – संपादक)
एकही गुन्हा नोंद नाही !
नातेवाईक आणि पालक यांच्यासमवेत सिद्धार्थ उद्यानात आलेल्या १७ वर्षीय मुलीचा भ्रमणभाष क्रमांक मिळवण्यासाठी १ रोडरोमियो तिला त्रास देत होता. पाठलाग करणार्या रोडरोमियोची माहिती ‘दामिनी पथका’ला देण्यात आली. पथकाने तात्काळ धाव घेऊन त्या मुलाला कह्यात घेत मुलीच्या नातेवाइकांना पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले; मात्र ‘आमची विनाकारण अपर्कीती होईल’, असे सांगत त्यांनी तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला. महिला पोलीस अधिकार्यांनी त्यांचे समुपदेशन केल्यानंतर परिसरातील पोलीस ठाण्यात किरकोळ तक्रार अर्ज दिला.
एका विवाहित महिलेच्या परिचित मित्राने तिच्या विवाहापूर्वीची खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ पतीला दाखवण्याची धमकी देत तिच्याशी संपर्कात रहाण्याचा प्रयत्न चालू केला. त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने अखेर दामिनी पथकाकडे धाव घेतली. पोलिसांनी महिलेला त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्यास सांगितले; मात्र हा प्रकार पतीला माहिती झाला तर ‘माझे आयुष्य उद़्ध्वस्त होईल. मला यातून बाहेर काढा. मला तक्रार द्यायची नाही,’ अशी विनवणी तिने केली. महिला पोलीस अधिकार्यांनी हा प्रश्न मार्गी लावला.(असेच सर्व प्रकरणात करणे अपेक्षित आहे ! पोलिसांनी समाजात असा धाक निर्माण करणे अपेक्षित आहे, की छेड काढण्याची कुणाचे धैर्यच होता कामा नये ! – संपादक)
तक्रार देण्यासाठी महिलांनी पुढे यावे !‘शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आदी ठिकाणी आम्ही जनजागृती करतो. मुलींना विश्वासात घेतल्यावर त्या मोकळेपणाने बोलतात; मात्र तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. अनेकदा गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्हीच तक्रार देण्यासाठी समुपदेशन करतो. त्यानंतर त्या तक्रार देतात.’ – अनिता फसाटे, फौजदार, दामिनी पथक |