भारतीय सैन्यात पाकिस्तानी नागरिक नोकरी करत असल्याचा आरोप !

  • गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश !

  • आय.एस्.आय.चा हात असल्याचा न्यायालयाला संशय !

कोलकाता (बंगाल) – भारतीय सैन्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना नोकरी दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यासंदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना घटनेचे अन्वेषण गुन्हे अन्वेषण विभागाकडे, म्हणजेच ‘सीआयडी’कडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.चा हात असल्याची शक्यता न्यायालयाने वर्तवली आहे.

१. याचिकाकर्ते विष्णू चौधरी यांनी या प्रकरणी सैन्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सैन्याने नागरिकत्वाची निश्‍चिती न करता संबंधितांना नोकरी दिल्याचा चौधरी यांनी दावा केला आहे.

२. येथील बैरकपूरच्या सैन्य छावणीत जयकांत कुमार आणि प्रद्युम्न कुमार हे पाकिस्तानी नागरिक नोकरी करत असल्याचे समोर आले. दोघांनी सैन्याची नोकरी मिळण्याच्या परीक्षेमध्येही बनावट कागदपत्रे सादर केल्याचे बोलले जात आहे.

३. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ जून या दिवशी होणार आहे.

संपादकीय भूमिका

याची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे, असेच जनतेला वाटते !