४ मौलानांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

बिहार येथील मुसलमान मुलांच्या तस्करीचे प्रकरण

(मौलाना म्हणजे इस्लामचे अभ्यासक)

मनमाड – बिहार राज्यातून मनमाड मार्गे रेल्वेने पुणे आणि सांगली जिल्ह्यात नेण्यात येणार्‍या लहान मुसलमान मुलांच्या तस्करी प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केलेल्या ४ मौलांनाना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. १२ जून या दिवशी मनमाड लोहमार्ग पोलिसांनी या चौघांना मनमाड न्यायालयात उपस्थित केले होते.

गेल्या आठवड्यात मनमाड शहरात ही घटना घडली होती. मनमाड रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या पथकाने २९ मुसलमान मुलांची तस्करी रोखली होती. या प्रकरणी मौलानांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी इगतपुरी, तसेच त्र्यंबकेश्‍वर येथील आमदार हिरामण खोसकर, हिंदु मुस्लिम हक सुरक्षा आणि विकास महासमितीचे अंजुम मकरानी, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांच्यासह या मुसलमान मुलांच्या पालक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी टी. गंगाथरन् यांची भेट घेतली. ‘आमची मुले लहान आहेत. त्यांना आमच्या कह्यात द्या. हवी ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य करतो’, अशी मागणी निवेदनातून केली. यावर जिल्हाधिकारी गंगाथरन म्हणाले की, मुलांना कह्यात देण्याची कायदेशीर प्रक्रिया चालू असून ती पूर्ण होताच मुलांना पालकांच्या स्वाधीन केले जाईल.