म्हादई प्रकरणी गोवा आणि कर्नाटक राज्यांना न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागेल ! – सी.टी. रवि

पणजी – म्हादई प्रकरण न्यायालयात आहे आणि राज्यांना न्यायालयाचा निकाल स्वीकारावा लागेल. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मी त्यावर बोलू शकत नाही, तिन्ही राज्यांना न्यायालयाचा निकाल स्वीकारावा लागेल. कर्नाटक आणि गोवा राज्य न्यायालयाच्या निकालाचे पालन करतील. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत. आमच्यासाठी कर्नाटक आणि गोवा दोन्ही महत्त्वाचे आहेत, असे भाजपचे गोवा राज्य प्रभारी (प्रभारी म्हणजे एका राज्यातील राजकीय पक्षाचा भार स्वीकारणारा दुसर्‍या राज्यातील त्याच पक्षाचा नेता) सी.टी. रवि यांनी म्हटले आहे. म्हादई प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘गोवा सरकार म्हादई खोर्‍यासाठी आणि गोव्याच्या लोकांसाठी पूर्णपणे वचनबद्ध आणि समर्पित आहे’, असे आश्वासन गोमंतकियांना दिले आहे.

भाजपचे गोवा राज्य प्रभारी सी.टी. रवि

गोवा सरकारने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात वर्ष २०१८ मधील म्हादई जलविवाद न्यायाधिकरणाच्या निवाड्याला आव्हान देणारी विशेष याचिका प्रविष्ट केली आहे. या निवाड्यात कर्नाटकला नदीपात्रातून १३.४२ टीएमसी पाणी वळवण्याची अनुमती दिली होती. कर्नाटक वाटप केलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वळवत आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींसारखी कामगिरी करू न शकल्याने कर्नाटकात भाजपचा पराभव ! – सी.टी. रवि

पणजी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने देशात काम केले, त्याप्रमाणे काम करू न शकल्याने कर्नाटकात भाजपचा पराभव झाला, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, कर्नाटकात भाजपला योग्य आख्यायिका मांडता आली नाही, हेच कर्नाटकात पक्षाचा पराभव होण्याचे एक कारण आहे. ही भाजपची चूक असून ती मान्य करायला हवी. विरोधी पक्ष अदानी आणि अंबानी यांच्यासाठी काम करत आहेत, तर भाजप गरिबांसाठी काम करत आहे. ‘काँग्रेस म्हणजे घोटाळा’ आणि ‘भाजप म्हणजे योजना’, असे आपण म्हणू शकतो. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात गरिबांना व्यवस्थेचा भाग बनवण्यात आले. मोदींचे राजकारण संपूर्ण भारताला व्यापून टाकते. भारताची परराष्ट्र धोरणे पूर्वी रशियाकेंद्रित किंवा अमेरिकाकेंद्रित होती; पण आता ती नेहमी भारतकेंद्रित असतात.

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा