१० वीच्‍या पूर्वपरीक्षेच्‍या वेळीही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या अनुसंधानात राहून तळमळीने सेवा आणि अभ्‍यास करणारा ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा चिंचवड (पुणे) येथील कु. ऋग्‍वेद नीलेश जोशी (वय १६ वर्षे) !

कु. ऋग्‍वेद जोशी

१. शाळेत उपक्रम चालू असल्‍याने कुणालाही सुटी घेण्‍याची अनुमती नसणे; मात्र गुरुकृपेने साधकाला हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यशाळेसाठी जाण्‍याची अनुमती मिळणे

‘७ ते १०.८.२०२२ या कालावधीत पुणे येथे ‘हिंदु जनजागृती समिती सेवक नेतृत्‍व विकास’ ही कार्यशाळा होती. त्‍याच वेळी ‘आजादी का अमृत महोत्‍सव’ या उपक्रमाच्‍या अंतर्गत शाळेतही पुष्‍कळ उपक्रम चालू होते. त्‍यामुळे कुणालाही सुटी घेण्‍याची अनुमती नव्‍हती; पण मला कार्यशाळेत शिकण्‍यासाठी जायचे होते. मी त्‍याविषयी मुख्‍याध्‍यापकांना विचारल्‍यावर गुरुकृपेने त्‍यांनी लगेच होकार दिला. त्‍यामुळे मला कार्यशाळेत सहभागी होण्‍याची संधी मिळाली.

२. पूर्वपरीक्षेच्‍या आदल्‍या दिवशी हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा होणार असल्‍यामुळे सेवेला जाता येणार नसल्‍याने मनाचा संघर्ष होणे, परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सेवेसाठी जाण्‍यास सुचवल्‍यामुळे सेवेसाठी जाणे आणि त्‍यांच्‍या कृपेने परीक्षा पुढे गेल्‍याने सेवा करता येऊन आनंद मिळणे

जानेवारी २०२३ मध्‍ये हडपसर (पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा आयोजित केली होती. मला सभेच्‍या सेवेसाठी जाण्‍याची फार इच्‍छा होती; पण सभेच्‍या दुसर्‍या दिवसापासून माझी १० वीची पूर्वपरीक्षा चालू होणार होती. त्‍यामुळे माझ्‍या मनाचा पुष्‍कळ संघर्ष होत होता. गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) सूक्ष्मातून मला ‘तू सेवेसाठी जा’, असे सुचवले. त्‍यामुळे मी सभेपूर्वी ३ दिवस हडपसर (पुणे) येथे सभेच्‍या सेवेसाठी गेलो. मी सभास्‍थानी पोेचल्‍यावर मला शाळेच्‍या गटावर संदेश आला, ‘पूर्वपरीक्षा नियोजित दिनांकाच्‍या ५ दिवसांनंतर चालू होईल.’ त्‍यामुळे गुरुदेवांच्‍या कृपेने मला सभास्‍थानी सेवा करता येऊन पुष्‍कळ आनंद मिळाला.

३. अभ्‍यास करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून मार्गदर्शन केल्‍याप्रमाणे अभ्‍यास करणे आणि परीक्षेत तेच प्रश्‍न येणे

अभ्‍यास करतांना मला सूक्ष्मातून गुरुदेवांचा आवाज ऐकू यायचा. ते मला ‘परीक्षेसाठी कुठला अभ्‍यास करायला हवा ?’, याचे मार्गदर्शन करायचे. परीक्षेमध्‍येही त्‍यावरच प्रश्‍न आलेले असायचे. उत्तरपत्रिका लिहितांना मी ‘गुरुदेव माझ्‍या शेजारी बसले आहेत’, असा भाव ठेवत असे.

४. सेवा केल्‍यामुळे मन आनंदी आणि एकाग्र होऊन अभ्‍यास चांगला होणे अन् ‘प.पू. गुरुदेवच अभ्‍यास करून घेत आहे’, असा भाव ठेवल्‍याने अभ्‍यास लवकर होणे

परीक्षेचा अभ्‍यास करतांना माझ्‍या लक्षात आले, ‘समष्‍टी सेवांचा लाभ मला सर्वच स्‍तरांवर होत आहे.’ सेवा केल्‍यावर मन आनंदी असल्‍यामुळे अभ्‍यास करतांना अजिबात ताण येत नसे आणि मन लगेच एकाग्र होऊन अभ्‍यास चांगला होत असे. सेवा करून अभ्‍यासाला बसल्‍यावर देवाच्‍या अनुसंधानात राहून अभ्‍यास केला जात असे. ‘गुरुदेवच माझ्‍याकडून अभ्‍यास करून घेत आहेत’, असा भाव ठेवल्‍याने अभ्‍यासही लवकर होत असे.

५. नववीच्‍या परीक्षेनंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा शिकण्‍यासाठी आल्‍यावर मनात ‘एक सेवा शिकायला मिळायला हवी’, असे अपेक्षेचे विचार येणे, याविषयी सहसाधकाशी बोलल्‍यानंतर ते विचार न्‍यून होणे

नववीची परीक्षा झाल्‍यानंतर सुटीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा शिकण्‍यासाठी आलो होतो. तेव्‍हा एक सेवा शिकण्‍यासाठी माझे नियोजन झाले; पण माझ्‍याकडून ते मनापासून स्‍वीकारले गेले नाही; कारण माझ्‍या मनात ‘मला दुसरी एक सेवा शिकायला मिळायला हवी’, असे अपेक्षेचे विचार होते. याविषयी सहसाधकाशी बोलल्‍यानंतर अपेक्षांच्‍या विचारांची तीव्रता न्‍यून होत गेली.

६. अपेक्षा न ठेवता ‘प.पू. गुरुदेव साधनेत प्रगतीसाठी आवश्‍यक अशीच सेवा देतील’, असा दृष्‍टीकोन ठेवल्‍यावर सेवा शिकण्‍याची संधी मिळणे

या वर्षी दहावीची परीक्षा झाल्‍यावर सुटीत पुन्‍हा माझे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा शिकण्‍यासाठी जाण्‍याचे नियोजन झाले. तेव्‍हाही माझ्‍या मनात काही प्रमाणात अपेक्षेचे विचार येत होते. तेव्‍हा मी ‘गुरुदेव मला माझी साधनेत प्रगती होण्‍यासाठी आवश्‍यक अशीच सेवा देतील’, असा दृष्‍टीकोन ठेवला. या वेळी अपेक्षा न ठेवल्‍यामुळे आश्रमात आल्‍यावर मला समजले, ‘जी सेवा शिकण्‍याची माझी इच्‍छा होती, ती सेवा शिकण्‍यासाठी नियोजन झाले आहे.’

– कु. ऋग्‍वेद नीलेश जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे), पुणे (०७.०४.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक