गोडसे यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते
मुंबई – मी गांधींच्या मतांशी सहमत नाही. मी राज्यघटनेचा अभ्यासक आहे. नथुराम गोडसे यांचा जो खटला चालला, त्यामध्ये नथुराम गोडसे यांच्यासमवेत न्याय झाला नाही. मी अभ्यास केला, तेव्हा लक्षात आले की, गोडसे यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे. नथुराम गोडसे इथून पुढे माझ्या चळवळीत असतील, असे विधान एस्.टी. कर्मचार्यांच्या संपाचे नेतृत्व करणारे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत केले. एस्.टी. कर्मचार्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
पत्रकार परिषदेच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासमवेत नथुराम गोडसे यांचे छायाचित्रही लावण्यात आले होते.
‘दाऊद हा कुणाच्या कार्यकाळात वाढला ? स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक शरद पवारांची आर्थिक नाडी आहे. पवारांमुळे एकदाही या कष्टकर्यांना अध्यक्षपद मिळाले नाही. शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आहे. त्याचे निर्जंतुकीकरण करणार आहे, तसेच यासाठी रॅली काढणार आहे’, असेही विधान त्यांनी या वेळी केले. ‘शिंदे सरकार आले आणि पवारांच्या घरावरील आक्रमणाच्या खोट्या गुन्ह्यात डांबलेल्या लोकांना पुन्हा नोकरी मिळाली’, असेही ते या वेळी म्हणाले.