परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांना आलेली अनुभूती आणि त्‍यांनी अनुभवलेली भावस्‍थिती !

पू. वामन राजंदेकर

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगाच्‍या वेळी पू. वामन यांचे डोळे पाणावणे आणि ‘ते एका वेगळ्‍याच भावस्‍थितीत आहेत’, असे जाणवणे

सौ. मानसी राजंदेकर

‘एकदा आम्‍हाला प.पू. गुरुदेवांचा (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्‍संग लाभला. प.पू. गुरुदेवांचे आगमन होण्‍यापूर्वी पू. वामन (सनातनचे दुसरे संत पू. वामन राजंदेकर, वय ४ वर्षे) आसंदीत अगदी शांत बसले होते; पण त्‍यांचे डोळे सारखे पाणावलेले दिसत होते. काही वेळाने तिथे प.पू. गुरुदेवांचे आगमन झाले. पू. वामन त्‍यांच्‍याकडे बघत होते. तेव्‍हा ‘पू. वामन एका वेगळ्‍याच भावस्‍थितीत आहेत’, असे मला जाणवत होते.

२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना बघितल्‍यावर पू. वामन यांना ‘मी निर्गुण अवस्‍थेत आहे आणि आपण कैलासातून शिवबाप्‍पाकडे जात आहोत’, असे वाटणे अन् आपतत्त्व वाढल्‍याचे जाणवणे

त्‍या सत्‍संगानंतर घरी आल्‍यावर मी पू. वामन यांना विचारले, ‘‘आज तुम्‍हाला गुरुदेवांना बघून काय जाणवत होते ?’’ तेव्‍हा पू. वामन मला म्‍हणाले, ‘‘नारायणांना बघून ‘मी निर्गुण अवस्‍थेत आहे आणि आपण कैलासातून शिवबाप्‍पाकडे जात आहोत’, असे मला वाटत होते. त्‍या वेळी माझा भाव जागृत होत होता आणि माझ्‍या डोळ्‍यांत अन् तोंडात पुष्‍कळ पाणी येत होते, म्‍हणजे आपतत्त्व पुष्‍कळ वाढले होते; म्‍हणून मी काही बोललो नाही.’’

३. पू. वामन यांनी सत्‍संगात सांगितलेली महत्त्वाची सूत्रे लिहून घेणे आणि त्‍याप्रमाणे साधना करण्‍यास सांगणे

पू. वामन यांनी त्‍यांच्‍या वहीत काहीतरी लिहून घेतले होते. नंतर मी त्‍यांना विचारले, ‘‘तुम्‍ही काय लिहून घेतले ?’’ त्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी साधनेबद्दल महत्त्वाचे सूत्र सांगितले आहे. आपण त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे साधना केली पाहिजे, तरच ते नारायणाला आवडेल.’’

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांच्‍या आई, आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के), फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक