बक्षीसपत्र (गिफ्ट डिड) : नगररचना नियोजन विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक !

‘गोव्यातील प्रचलित कायद्याच्या प्रावधनांनुसार येथील भूमीच्या संदर्भातील मालमत्तेचे ‘बक्षीसपत्र’ म्हणजेच ‘गिफ्ट डिड’ करायचे असल्यास त्या त्या विभागातील ‘नगररचना नियोजन विभाग’ (टीसीपी म्हणजे टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग) या शासकीय विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एन्.ओ.सी.) घ्यावे लागते. ‘टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग ॲक्ट, गोवा’ यातील कलम ४९(६) नुसार ते आवश्यक आहे. समजा एका जोडप्यातील एकाला म्हणजे नवऱ्याला स्वतःच्या मालकीचा अर्धा मालकी भाग त्याच्या बायकोला बक्षीस म्हणून द्यायचा असेल, तर रक्ताच्या नात्यात (विदीन ब्लड रिलेशन) या मथळ्याखाली हे ‘गिफ्ट डिड’ करता येते. यानुसार नवऱ्याच्या मालकीच्या ५० टक्के मालकी ही बायकोला हस्तांतरित होते आणि बायको पूर्ण मालक होते.

१. ऑनलाईन बक्षीसपत्र करण्याची पद्धत

गोव्यातील भूमी कायद्यान्वये प्रत्येक मिळकतीमध्ये ‘डिस्पोझेबल’ (समभागांची विल्हेवाट) आणि ‘नॉन-डिस्पोझेबल शेअर’ (समभागांची विल्हेवाट न लावणे) प्रत्येकाचा असतो. त्यामुळे अर्थातच १०० टक्के मालकी पूर्ण प्रस्थापित होत नसेल आणि जर कुणाचाच आक्षेप नसेल, तर अडचणी उद्भवत नाहीत. जर एखाद्याला बक्षीसपत्र करायचेच असल्यास विदित नमुन्यातील ड्राफ्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, संपत्तीची मालकी प्रस्थापित असल्याची कागदपत्रे, ‘१/१४ फॉर्म’ हे संकेतस्थळावर ‘ऑनलाईन अपलोड’ करावे लागतात. ते अपलोड झाले की, नोंदणीकृत कार्यालयातून (‘रजिस्ट्रेशन ऑफिस’मधून) जर काही शंका / प्रश्न (क्वेरी) असेल, तर ती दुरुस्त करून पुन्हा ते अपलोड केल्यावर नोंदणीकृत कार्यालयाकडून मान्यता (ॲप्रूव्हल) मिळते आणि त्यानुसार नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन चार्जेस) अन् सांगितल्याप्रमाणे ‘स्टँप पेपर्स’ उपलब्ध करून द्यावे लागतात. त्यावर मान्यता मिळालेला ‘ड्राफ्ट डाऊनलोड’ करून त्याची छापील प्रत (प्रिंट) काढून घ्यावी. आवश्यक ते नोंदणी शुल्क ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘डेबिट कार्ड’/‘क्रेडिट कार्ड’च्या माध्यमातून भरावे. या ड्राफ्टमध्ये देणारे आणि घेणारे यांचे हाताचे ठसे घ्यावे लागतात.

२. रक्ताच्या नात्यात म्हणजेच वडील-मुलगा, आई-वडील, आजोबा-नात/नातू, भाऊ-बहीण, आई-वडील-मुलगा, या प्रथम प्राधान्याच्या नातेवाईकांसाठी गोव्यामध्ये केवळ १० सहस्र रुपयांमध्ये ‘गिफ्ट डिड’ करता येते. सक्षम ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’नुसारही (अधिकारपत्रानुसार) बक्षीसपत्र करता येते; परंतु ते रक्ताच्या नात्यासाठीच मान्यताप्राप्त आहे.

३. मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र यांमधील भेद

बक्षीसपत्रानुसार देणाऱ्याच्या हयातीतच मालकी घेणाऱ्याला हस्तांतरित होते. थोडक्यात मालकी जाते. मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र यांमध्ये हा मूलभूत पालट आहे. मृत्यूपत्रानुसार मालकी व्यक्ती मेल्यानंतरच जाते, म्हणजेच मरेपर्यंत तो व्यक्तीच मालक असतो आणि तो ती मृत्यूपत्रात लिहिलेली संपत्ती कधीही विकू किंवा बक्षीस म्हणून देऊ शकतो. जर मृत्यू झाला आणि मृत्यूपत्र केलेले असेल, तरच ती संपत्ती मृत्यूपत्रात लिहिलेल्या इसमाकडे जाते. याउलट बक्षीसपत्र केल्या केल्या मालकी हस्तांतरित होते.’

– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा. (२.६.२०२३)