विनामूल्य घेणे आणि देणे !

ठाण्यापासून ते पनवेलपर्यंत ४० कि.मी. अंतरामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि रेल्वे यांच्या जागेवर अनधिकृत झोपडपट्ट्या बांधल्या जात आहेत. पारसिक डोंगररांगा या गुन्हेगारीचे केंद्र झालेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांनी वेढल्या आहेत. प्रशासन मात्र या संदर्भात काही कारवाई करत नाही. येथे मतपेटी आणि भ्रष्टाचार अशी दोन्ही कारणे असू शकतात. सध्या सामाजिक माध्यमांवर एक लिखाण प्रसारित होत आहे. त्यात म्हटले आहे, ‘नवी मुंबईत घर हवे असेल, तर अभ्यास, नोकरी इत्यादी करण्याऐवजी एखाद्या सरकारी जागेवर ‘पाल’ (तात्पुरती ताडपत्रीची झोपडी) टाकायची. त्यानंतर काही वर्षांनंतर पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्र सरकार तुम्हाला घर बांधून देईल. ते घर परत भाड्याने द्यायचे आणि दुसरीकडे झोपडी बांधायची.’ इतके हे गंभीर प्रकरण झाले आहे. ‘या अनधिकृत बांधकामांना राजकीय आश्रय आहे का ?’, हे पडताळले पाहिजे. कुठलाही राजकीय पक्ष यावर बोलत नाही किंवा कठोर कारवाई करत नाही.

मध्यमवर्गीय माणसाने आयुष्यभर नोकरी करायची, सर्व कर भरायचे आणि राजकीय पक्षांनी त्यामधून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अनेक गोष्टी विनामूल्य वाटायच्या ! याखेरीज सर्वत्र वाढणाऱ्या या अनधिकृत वस्त्यांमुळे जे कर भरून रहातात, त्यांच्या पाणी, वीज, रस्ते आदी सुविधांवरही विपरित परिणाम होतो, ते वेगळेच. यामुळे कर भरणाऱ्या सामान्यांच्या संतापाचा एखाद दिवशी उद्रेक झाला, तर आश्चर्य वाटू नये ! नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आश्वासनांची खैरात केली. त्यात ‘२०० युनिट वीज विनामूल्य, परिवारातील प्रमुख महिलेला प्रतिमाह २ सहस्र रुपये, बेरोजगार पदवीधरांसाठी ३ सहस्र, तर डिप्लोमा धारकांसाठी १ सहस्र ५०० रुपये प्रतिमाह देण्यात येतील’, असे सांगितले. याचा परिणाम असा झाला की, निवडणुकीच्या निकालानंतर काही नागरिकांनी वीजदेयक भरण्यास नकार दिला. विनामूल्य देण्याच्या अशा सवयींमुळे तरुण उद्योगधंदे करतील का ? त्यांना आपण कुठल्या मार्गावर घेऊन जात आहोत, याची जाणीव राजकीय पक्षांना नाही. ‘देशाला ‘उभारी’ देण्याऐवजी ‘कर्जबाजारी’ करण्याचे ‘काँग्रेस’ने ठरवले आहे’, असेच यावरून वाटते. अनधिकृत बांधकामे सरकारकडून ती नियमित करून घेणे काय किंवा शासनकर्त्यांनी अशा आश्वासनांची लालूच दाखवणे काय, यामुळे ‘फुकट्यां’ची जमात निर्माण होते. आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी त्याग करणाऱ्या प्रजेची आवश्यकता असून या फुकटेपणावर चाप बसवायला हवा !

– श्री. जयेश बोरसे, पुणे