मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथून वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ४० हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
मुंबई येथे पत्रकार परिषद
मुंबई, १२ जून (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १६ ते २२ जून या कालावधीत गोवा राज्यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे ११ वे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथून विविध संघटनांचे ४० हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी दिली. १२ जून या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी मेढे (वसई) येथील परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य श्री. पी.पी.एम्. नायर, सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर आणि हिंदु गोवंश रक्षा समितीचे समन्वयक श्री. दीप्तेश पाटील हे उपस्थित होते.
या महोत्सवात सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुभाष झा, अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीस स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, सुप्रसिद्ध उद्योजक ‘पितांबरी’ उद्योग समुहाचे संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई, सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. अमित थडानी, श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघाचे अध्यक्ष श्री. मोतीलाल जैन, अधिवक्ता सिद्ध विद्या, गोरक्षक श्री. अशोक राजपूत, विरार येथील श्री जीवदानी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री. प्रकाश तेंडोलकर, सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत, असेही श्री. सतीश कोचरेकर यांनी सांगितले.
परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी वेदांचा अभ्यास करून संस्कृतीरक्षणाचे, तसेच समाजातील दुष्प्रवृत्तींविरोधात संघटितपणे प्रतिकार करण्याचे आवाहन केले, तर केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य श्री. पी.पी.एम्.नायर आणि हिंदु गोवंश रक्षा समितीचे समन्वयक श्री. दीप्तेश पाटील यांनीही हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य संघटितपणे करण्याचा सर्व संघटनांनी निर्धार केला असल्याचे याप्रसंगी सांगितले.
अधिवेशनाचे थेट प्रसारण ! हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यूट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या ‘फेसबुक’ लिंक द्वारेही अधिवेशनाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले. |