भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग करून मारहाण करणार्‍यांना अटक

सैनिकाने व्हिडिओ प्रसारित करून केली होती कारवाईची मागणी !

हवालदार प्रभाकरन् : व्हिडिओ बनवून या घटनेची माहिती देत पोलिसांकडे साहाय्याची याचना करतांना

चेन्नई (तमिळनाडू) – भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी रामू आणि हरि प्रसाद या दोघांना अटक केली आहे. हवालदार प्रभाकरन् असे या सैनिकाचे नाव असून त्याने या संदर्भात एक व्हिडिओ बनवून या घटनेची माहिती देत पोलिसांकडे साहाय्याची याचना केली होती. प्रभाकरन् तमिळनाडूतील पडवेडू गावचा रहिवासी आहे. सध्या तो काश्मीरमध्ये तैनात आहे. प्रभाकरन् याची पत्नी रुग्णालयात भरती आहे.

१. प्रभाकरन् यांनी सांगितले होते की, माझी पत्नी तमिळनाडूमधील एका गावात भाड्यावर घेतलेले दुकान चालवते; मात्र काही लोक तिला बर्‍याच दिवसांपासून त्रास देत आहेत. गुंडांनी दुकानातील सामान बाहेर फेकले. त्यांनी माझ्या कुटुंबावर चाकूने आक्रमण केले आणि धमकावले. माझ्या पत्नीला अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन पाठवले असून त्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. पोलीस महासंचालकांनी कृपया साहाय्य करावे.

२. भारतीय सैन्याने प्रभाकरन् यांच्या कुटुंबियांना संपूर्ण सुरक्षेचे आश्‍वासन दिले आहे.

स्थानिक सैन्याधिकारी कुटुंबाच्या संपर्कात आहेत आणि सैनिकाच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि नागरी प्रशासन यांच्याशी बोलले आहेत.

संपादकीय भूमिका

भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्‍या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्‍यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !