नीला फुगणे (‘व्हेरिकोज व्हेन्स’) मुळे पायाला वेदना होत असतांना त्रास न होण्यासाठी ‘पाय गुरुदेवांनी धरला आहे’, असा भाव ठेवल्यावर साधकाची भावजागृती होणे
१. नीला फुगणे (‘व्हेरिकोज व्हेन्स’च्या) त्रासामुळे पायात ‘स्टॉकिंग्ज’ घालणे आणि त्या वेळी ‘कुणीतरी पाय घट्ट धरला आहे’, असे वाटून वेदना होणे
‘मला नीला (अशुद्ध रक्तवाहिन्या) फुगणे (‘व्हेरिकोज व्हेन्स’) हा शारीरिक त्रास आहे. त्यासाठी मला पायात ‘स्टॉकिंग्ज’ (पाय आणि पोटर्या झाकणारे पायमोजे) घालावे लागतात. जेव्हा मी पायात स्टॉॅकिंग्ज घालतो, तेव्हा मला त्याचा फार त्रास होतो. त्या वेळी मला वेदना होऊन ‘कुणीतरी पाय घट्ट धरला आहे’, असे वाटून ‘काय करू आणि नको’, असे होते.
२. पायाला वेदना चालू झाल्यावर देवाने त्रास न होण्यासाठी ‘पाय गुरुदेवांनी धरला आहे’, असा भाव ठेवण्यास सुचवणे आणि तसे केल्यावर भावजागृती होणे
एके दिवशी पायात स्टॉकिंग्ज घातल्यावर नेहमीप्रमाणे मला वेदना होत होत्या. मग देवाने मला सांगितले, ‘तुला असे वाटते ना की, कुणीतरी तुझे पाय घट्ट धरले आहेत. ते दुसरे कुणी नसून तुझे गुरुदेव आहेत. तू स्वतःची काळजी घेत नाहीस ना, त्यांचे चरण घट्ट धरत नाहीस ना; म्हणून तुला कोणताही त्रास नको व्हायला, यासाठी त्यांनीच तुझे पाय घट्ट धरले आहेत.’ देवाचे हे बोलणे ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. आता मला तसा त्रास चालू झाला की, ‘गुरुदेवांनीच माझे पाय घट्ट धरले आहेत’, असे वाटते आणि भावजागृती होते.
जगाच्या पाठीवर अशा अद्भुत अनुभूती देणे आणि भावाचे प्रयत्न सुचवणे केवळ परात्पर गुरुदेवांनाच शक्य आहे. त्यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अपूर्व ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |