हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात संतांचे योगदान महत्त्वाचे !
१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…
१. कार्य यशस्वी करण्यासाठी आध्यात्मिक अधिष्ठानाचे महत्त्व
‘भारत एक आध्यात्मिक भूमी आहे. येथील इतिहासामध्ये जे काही चांगले परिवर्तन झाले, त्या सर्वांमागे आध्यात्मिक संस्थांचे पूर्णतः योगदान आहे. त्यामुळे कोणतेही कार्य यशस्वी करायचे असल्यास आपल्याला आध्यात्मिक स्तरावर किंवा त्या संस्थांच्या माध्यमातूनच कार्य करणे आवश्यक आहे. येथे प्रत्येक भारतीय व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांचा विचार करते, हा या भारतीय मातीचा एक गुण आहे. ती व्यक्ती कोणत्याही पंथाची असली, तरी कधी ना कधी आध्यात्मिक संप्रदाय किंवा संस्था यांच्याशी जोडली जाते. त्यामुळे आज आपल्या देशात संत आणि आध्यात्मिक संस्था यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व संत आणि आध्यात्मिक संस्था हिंदु राष्ट्राची मागणी करण्यासाठी एकत्रितपणे रस्त्यावर उतरल्या, तर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे कार्य अत्यंत सुलभ होऊन जाईल. आपण सर्व जण हेच कार्य करत आहोत. आम्ही कर्नाटकामध्ये ‘राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले होते. तेव्हा तेथेही पुष्कळ सारे संतगण उपस्थित होते. त्या वेळी मी वैयक्तिकरित्या त्यांच्या भावना समजून घेतल्या.
२. समाजाने संतांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटण्याची आवश्यकता !
आपल्या भारतात साधूसंतांचे पुष्कळ मोठे आश्रम आहेत. एकेका आश्रमात आपले संत सुवर्ण सिंहासन बनवून बसलेले असतात. ‘भारतात हिंदु समाजाला त्रास होत असून तो धोक्यात आहे’, याची जाणीव त्यांनाही आहे; परंतु ते सुवर्ण सिंहासन सोडून खाली उतरू शकत नाहीत. ते सिंहासनवरून खाली उतरले, तर त्यांचा मान-सन्मान धुळीस मिळेल, असे त्यांना वाटते.
सध्या आपल्या समाजामध्ये भ्रमण करणार्या, भक्तजनांना सहजपणे भेटणार्या आणि अधिक प्रमाणात बोलणार्या संतांना कनिष्ठ समजले जाते. त्यामुळे अनेक संत खुल्या व्यासपिठावर येण्यास धजावत नाहीत. उलट आज सुवर्ण सिंहासनावर बसणारे आणि मौन पाळणारे संत यांना श्रेष्ठ समजले जाते. याविषयी एक उदाहरण देतो. एकदा एक भिक्षुक एका घरी भिक्षेसाठी गेला. तेव्हा त्या घरातील स्त्रीने त्याला एक कापड दान म्हणून दिले. त्या कापडाचा रंग केसरी होता. त्याला मिळालेले केशरी वस्त्र अंगावर पांघरून तो सार्वजनिक ठिकाणी येऊन बसला. तो तोतरे (बोबडे) बोलत असल्याने त्याला नीट बोलता येत नव्हते. त्यामुळे तो अत्यल्प बोलत असे किंवा गप्प रहात असे. त्यामुळे लोक त्याला महाज्ञानी समजू लागले. ते महात्मा असल्याचा प्रचार आपोआप होऊ लागला आणि आता ते उत्तर भारतामध्ये ते एक मोठे संत म्हणून सुपरिचित झाले आहेत. ते बोलत का नाहीत ? हे कुणीच समजून घेतले नाही. ते अधिक शिकले सवरलेलेही नव्हते. वेद, शास्त्र आणि उपनिषदे जे आमच्या भारतीय संस्कृतीचे मूळ ग्रंथ आहेत, त्यांचा त्यांना साधा गंधही नव्हता; तरीही ती व्यक्ती आज कोट्यवधींच्या आश्रमांची मालक झाली आहे. त्यामुळे आज आपल्याला संतांकडे पहाण्याची दृष्टी पालटण्याची आवश्यकता आहे.
३. भारतात धार्मिकतेचे अवडंबर माजवणार्या संतांना अधिक मान्यता !
याविषयी मी कर्नाटकच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असलेल्या संतांशी बोललो. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही जर अधिक बोलू लागलो, तर याच समाजातील लोक आम्हाला दूर करतील. तसेच प्रसारमाध्यमेही आमच्यावर सतत दृष्टी ठेवून रहातील. आमच्या तोंडून एखादा चुकीचा शब्द बोलला गेला किंवा आमच्या वागण्यात लहानशी चूक झाली, तरी ते आमची प्रचंड प्रमाणात अपकीर्ती करतील. तेच काम आपला समाजही करील.’’ त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र’ आणण्याचे कार्य आमचे नसून ते कार्य राजकारणी लोकांचे आहे. ते योगी आदित्यनाथ किंवा पंतप्रधान मोदी करतील. त्यासाठी आम्ही केवळ विचार करू किंवा परमात्म्याला प्रार्थना करू. आम्ही जनजागृती करण्यासाठी उघडपणे कार्य करू शकत नाही. आम्ही उघडपणे कार्य करू लागलो, तर हाच समाज आम्हाला अज्ञानी समजू लागेल; कारण की आम्हा संतांना अधिक बोलण्याला बंदी आहे. आम्हाला अधिक भ्रमण करायला बंदी आहे. आम्ही संत एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीशी सहजतेने भेटू शकत नाही. जर मी सर्वसामान्य व्यक्तीशी सहजपणे बोलू लागलो, तर तुमच्या दृष्टीने आमचा स्तर कनिष्ठ होतो. माझ्या अवतीभोवती नेहमी ४-५ लोक, तरी असायला पाहिजेत. ते सर्व माझ्या आजूबाजूला फिरले पाहिजेत. माझ्याकडे किमान ४० लाख रुपयांची चारचाकी असली पाहिजे. माझा आश्रम वातानुकूलित (एअरकंडिशनर) असायला पाहिजे. असे असेल, तरच मला लोकमान्यता मिळेल, असा एक समज आहे. अशा प्रकारची एक विचारसरणी आज प्रत्येक स्वामीजी किंवा महात्मा यांच्या मनात घर करून बसली आहे. जे चांगले कार्य करतात वा चांगले प्रवचन करू शकतात किंवा जनजागृती करतात, त्या संतांना अल्प मान्यता मिळते. जी व्यक्ती केवळ धार्मिकतेचे अवडंबर माजवते, त्या व्यक्तीला अधिक मान्यता मिळते.
४. शुक्रवारच्या नमाजाला न येणार्या मुसलमानाच्या घरी जाऊन त्याची चौकशी करणारे मौलाना !
याउलट अन्य पंथियांकडे बघा. आजपर्यंत मी कोणत्याही मौलानाला (इस्लामी अभ्यासक) सुवर्ण सिंहासनावर बसलेला पाहिलेला नाही. तो एकेका घरात जातो. मशिदीमध्ये होणार्या शुक्रवारच्या नमाज पठणाला एखादी मुसलमान व्यक्ती आली नसेल, तर त्याकडे या मौलानाचे लक्ष असते. ती व्यक्ती सतत २ शुक्रवार नमाज पठणाला आली नसल्याचे मौलानाला दिसले, तर तिसर्या शुक्रवारी तो त्या व्यक्तीच्या घरी दिसेल. हा मौलाना त्याच्या घरी जाऊन ‘तू नमाजासाठी का आला नाहीस ?’, असे विचारतो. याउलट आमच्या संत समाजामध्ये तशी प्रथा नाही; कारण की ‘आम्ही सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे समाजात जाऊन मिसळू शकत नाही’, असे संत समाजाला वाटत असते. मौलाना मात्र सहजपणे सामान्य माणसासारखा कुठेही जाऊ शकतो. तो रेल्वेने किंवा बसने प्रवास करू शकतो. तो सर्वांमध्ये मिसळून जाऊ शकतो.
५. सर्व संत समाजाने एकत्रितपणे ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे आवश्यक !
एक ख्रिस्ती पाद्री सहजपणे सर्वकाही करतो. तो त्याच्या ख्रिस्ती लोकांना सहजपणे भेटू शकतो. याउलट हिंदु संन्यासी सर्वांना सहजपणे भेटू शकत नाही. ‘हिंदु संन्यासी आपणा सर्वांना सहजतेने भेटला, तर त्याची किंमत न्यून होईल’, अशी मानसिकता अलीकडे बनली आहे. ही मानसिकता आपल्याला पालटावी लागेल आणि सर्व संत-महात्म्यांनी रस्त्यावर उतरून ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी केली पाहिजे. आज भारतातील सर्व संतांनी एकदा एकत्रितपणे रस्त्यावर येऊन ‘आम्हाला हिंदु राष्ट्र पाहिजे !’, असे घोषित केले, तर आजच ‘हिंदु राष्ट्र’ येऊ शकते. संतांसाठी हिंदु राष्ट्र आणणे, ही काही फार मोठी गोष्ट नाही.
आज आपल्या संतांकडे पुष्कळ साधनसंपत्ती आहे, तपश्चर्येची शक्ती आहे, पूर्वजांची शक्ती आहे आणि देवतांचे आशीर्वाद आहेत. या सर्व गोष्टी ज्या कार्यासाठी उपयोगात आणल्या पाहिजेत, त्या कामासाठी उपयोगात आणल्या जात नाहीत. त्यांचा पैसा महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि अन्य मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी वापरला जातो; परंतु हिंदु समाजातील संकटात असलेल्या हिंदु बंधू-भगिनींच्या अडचणी कुणीही संत साधे ऐकूनही घेत नाहीत. असे केल्याने त्यांचे मूल्य न्यून होईल, अशी भीती त्यांना वाटते. त्यांच्या मनातील हा अपसमज आपल्याला प्रथम दूर करायला पाहिजे.
आपला संत समाज एवढा शक्तीशाली आहे की, कोणताही पंथ त्याच्याशी टक्कर देऊ शकत नाही. आपल्याकडे मोठमोठे विद्वान आणि तपस्वी आहेत. त्यांच्यावर देवतांचा आशीर्वाद आहे. एवढे सामर्थ्य असूनही ज्या कार्यासाठी ते वापरले पाहिजे, त्या कार्यासाठी ते वापरले जात नाही. यासाठी आपल्याला कार्य करणे आवश्यक आहे.
६. हिमालयामध्ये तपसाधना करणार्या संतांचे संघटन करून हुणांचा पराभव करणारे आद्यशंकराचार्य !
आजचा काळ संक्रमणाचा आहे. आज आम्हा संतांना भगवान परशुरामासारखे कार्य करण्याची आवश्यकता आहे. संतांनी आज आद्यशंकराचार्य यांच्यासारखे कार्य करायला पाहिजे. आद्यशंकराचार्यांनी संपूर्ण भारतामध्ये भ्रमण केले. धर्मसंस्थापना आणि सनातन धर्माचा प्रचार करतांना त्यांचा मोठमोठ्या विद्वानांशी वादविवाद झाला. त्यात त्यांनी विजय संपादन केला. असे करत करत ते काश्मीरच्या दिशेने गेले. तेथे त्यांना एक मोठी अडचण समोर आली. तेथील हूण जातीच्या लोकांमध्ये डाकूगिरी करणारा एक गट होता. मोगलांच्या पूर्वीपासून ते भारतावर आक्रमण करत होते. ते अत्यंत क्रूर होते. लोकांची कत्तल करणे, अत्याचार करणे आणि लुटालूट करणे, हेच त्यांचे काम होते. शंकराचार्य हिमालयाच्या त्या भागातून जात असतांना तेथील ग्रामस्थांनी येऊन शंकराचार्यांना ही समस्या कथन केली. तेव्हा शंकराचार्यांनी हूणांना वादविवाद किंवा शास्त्रालाप करण्यासाठी बोलावले नाही. तेव्हा त्यांनी एक काम केले. जे साधूसंत हिमालयात गुहेत बसून तपश्चर्या करत होते, त्या सर्व साधूसंतांना एकत्र केले. हिंदु धर्माला कसे वाचवायचे ? यावर चर्चा केली. त्यांना त्रिशूळ दीक्षा देण्यात आली. आद्य शंकराचार्यांनी म्हटले, ‘‘ज्या हातामध्ये तुम्ही जपमाळा आणि दंड कमंडलू धारण करत होता, त्याच हातात मी तुम्हाला त्रिशूळ दिला आहे.’’ त्या सर्व लोकांनी त्रिशूळ धारण केले. त्यानंतर त्रिशूळ धारण केलेले ११ सहस्र संत एकाच वेळी हूणांशी भिडले. त्या वेळी हूणांशी घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात हूणांचा सर्वनाश झाला. भारतियांवर अत्याचार करणार्या हुणांना चाप बसला. त्यानंतर तेथे असणार्या अन्य पंथियांशी आद्यशंकराचार्यांनी शास्त्रालापही केला. यावरून शिकायला मिळते की, आज भारतातील हिंदूंची स्थिती पहाता साधूसंतांनी आत्मसाक्षात्कारासाठी कार्य करण्याची ही वेळ नाही, तर ही संघर्ष करण्याची वेळ आहे. हे आपल्याला प्रत्येक संतांना समजावून सांगावे लागेल.
७. ‘हिंदु राष्ट्रा’साठी केवळ विचारविमर्श नाही, तर प्रत्यक्ष संघर्ष करण्याची वेळ !
भगवान परशुराम यांचे पिता महर्षि जमदग्नी होते. परशुराम एक महान तपस्वी होते; परंतु जेव्हा सर्वत्र अज्ञानाचा अंधकार पसरला आणि धर्मावर अधर्माचे राज्य चालू झाले, तेव्हा त्यांनी त्याच्या हातात तळपता परशु धारण केला. त्याप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे कार्य काही फार मोठे नाही. हे हिंदूंचेच राष्ट्र आहे. आपलेच राष्ट्र आपण मागत आहोत. त्यासाठी प्रत्येक संन्यासी आणि महात्मा यांनी आज रस्त्यावर येऊन ‘आम्हाला हिंदु राष्ट्र पाहिजे’, अशी सतत घोषणा केली, तर उद्याच ‘हिंदु राष्ट्र’ येऊ शकते. अशा प्रकारे सर्वांनी त्यांचे मठ सोडून ‘हिंदु राष्ट्रा’साठी कार्य करण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. सर्वजण एकत्र आले, तर हा देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल. आज ‘हिंदु राष्ट्रा’साठी केवळ विचारविमर्श नाही, तर प्रत्यक्ष संघर्ष करण्याची वेळ आली आहे. भगवंताने आपल्याला जे दिलेले आहे, त्याचा त्याग हिंदु राष्ट्रासाठी करूया. शीघ्रातीशीघ्र वेळेत या भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.’
– पू. परमात्माजी महाराज, धारवाड, कर्नाटक.