१६ जून ते २२ जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर येथे पत्रकार परिषद
सोलापूर, ११ जून (वार्ता.) – १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे अध्यक्ष श्री. प्रसाद पंडित (गुरुजी), हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्थित होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर म्हणाले की, या अधिवेशनाला देश विदेशांतील ३५० हून अधिक हिंदु संघटनांच्या १ सहस्र ५०० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. अधिवेशनाला वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी, अधिवक्ता सौ. अर्चना बोगम, अधिवक्ता सौ. आरती अंबिगार, श्री. सत्यनारायण गुर्रम, श्री. बापू ढगे, श्री. योगिनाथ फुलारी, ज्योतिषाचार्य श्री. प्रसाद पंडित हेही या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.