सर्व धर्मांचा आदर राखणे हे आपले कर्तव्य !
कोल्हापूर येथे २०० मशिदींमध्ये मुसलमानांच्या संस्थांकडून प्रबोधन
कोल्हापूर – आपण छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहोत. त्यामुळे हा विचार अधिक नेटाने पुढे नेतांना सर्व धर्मांचा आदर राखणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. या विचारांना तडा जाईल, अशी कुठलीही कृती आपल्याकडून होता कामा नये. असे प्रबोधन जिल्ह्यातील २०० हून अधिक मशिदींत झाले. शुक्रवारी नमाजानंतर सुमारे ४० मौलवी, धर्मगुरु यांच्या उपस्थितीत याविषयीच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील ६५ हून अधिक मशिदींत प्रत्यक्ष, तर जिल्ह्यातील इतर सर्व मशिदींत ‘डिजिटल’ माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.(केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात आणि देशभरात अनेक ठिकाणी ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना घडल्या आहेत. यात हिंदु युवतींना फूस लावून धर्मांतराचे अनेक प्रकार उजेडात येत आहेत. मुसलमान संघटना, धर्मगुरु एकीकडे प्रबोधन केल्याचे सांगतात आणि प्रत्यक्षात मात्र अशा घटना कुठेच अल्प होतांना दिसत नाहीत. यात केवळ फसवून विवाह केल्याच्या घटना नाही, तर त्यांच्या हत्या केल्याच्या घटना देहली, झारखंड येथे झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेब आणि टीपू सुलतान यांचे ‘स्टेटस’ ठेवल्याच्या घटनांनंतर लगेच आष्टी (सोलापूर) यांसह अनेक ठिकाणी तेच प्रकार उघडकीस आले. त्यामुळे हे केवळ प्रबोधन न रहाता ते प्रत्यक्ष कृतीत कसे येईल ? याकडेही पाहिले पाहिजे ! – संपादक)
सामाजिक माध्यमांचा वापर करतांना काळजी घ्या, आपल्या मुलांच्या हातात भ्रमणभाष देतांना कोणतीही जात आणि धर्म यांच्या भावना दुखावणार नाहीत. याची ताकीद त्यांना द्या, अशा सूचना देण्यात आल्या. (हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणार्या घटना घडतात, तेव्हा अनेक वेळा आरोपी हा अल्पसंख्य समाजातील अल्पवयीनच कसा असतो ? आणि त्याच्याकडून हिंदु धर्मियांच्याच भावना दुखावण्याचे काम कसे होते ? ते स्वत:हून अशा कृती करतात का ? त्यांना पुढे करून अशा कृती घडवल्या जातात ? अशा घटना झाल्यावर अल्पसंख्यांक समाजातील संबंधित मुलाचे आई-वडील त्याला स्वत:हून पोलीस ठाण्यात घेऊन आले आहेत, असे दिसत नाही. याउलट अनेक वेळा मुलासह आई-वडील पसार असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे केवळ जे प्रबोधन केले जाते ते प्रत्यक्षात उतरते का ? तेही पहाणे अत्यावश्यक आहे ! – संपादक)
या वेळी कोल्हापूर नाही, तर महाराष्ट्र नाही, तर देशभरात शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. या उपक्रमात ‘मुस्लीम बोर्डींग’, ‘जिल्हा बैतुलमाल कमिटी’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. (संदर्भ – दैनिक सकाळ)