संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीमध्ये पालट !
पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीमध्ये पालट करण्यात आले आहेत. हे पालट लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. दोन्ही पालखी सोहळ्यांच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत पालट केला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १४ ते १८ जून या कालावधीमध्ये तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १५ जून ते २४ जून या कालावधीमध्ये पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.