ऐन पालखी सोहळ्यात महावितरणचे आळंदीत (पुणे) अघोषित भारनियमन !
राज्यभरातून आलेले भाविक, आळंदीकर घामाघूम !
आळंदी (जिल्हा पुणे) – प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी घेऊन पंढरीला जातात. प्रशासनाकडून यासाठी सर्व सिद्धता करण्यात आली आहे . महावितरणनेही वारंवार आपण वारीसाठी सज्ज असल्याची आणि सर्व सिद्धता केल्याची पत्रकबाजी केली ; परंतु वारंवार वीजपुरवठा खंडित केल्याने लाखो भाविक आणि आळंदीकर घामाघूम झाले आहेत. गेल्या ३ दिवसांपासून प्रतिदिन आळंदीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.
राज्यातून आणि परराज्यातून लाखो भाविक आळंदी आणि परिसरात आले आहेत. ठिकठिकाणी तंबू आणि धर्मशाळा यांमधून त्यांचा मुक्काम आहे. महावितरणने पर्यायी ‘लाईन’वरून आळंदी आणि परिसराला वीजपुरवठा करावा, अशी मागणी आळंदीकर ग्रामस्थ आणि भाविक यांकडून होत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? महावितरणच्या प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)