वारीचे स्‍वरूप बदलले असले, तरी आजही त्‍याचा आत्‍मा कायम आहे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर

वारीने समृद्ध परंपरा निर्माण केली आहे.

पुणे – अंदाजे आठशे वर्षांपूर्वी राज्‍यात वारीची परंपरा चालू झाली. वारी, दिंडी आणि पालखी या शब्‍दांमध्‍ये फरक आहे; मात्र वारीचे स्‍वरूप बदलले तरी आजही वारीचा आत्‍मा कायम आहे. वारीने समृद्ध परंपरा निर्माण केली आहे. असे मत मूर्तिशास्‍त्राचे अभ्‍यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी व्‍यक्‍त केले. विठ्ठल हा देव वारीच्‍या केंद्रस्‍थानी असून त्‍याच्‍याविना वारी पूर्ण होत नाही हेही त्‍यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले. मुंबई येथील प्राध्‍यापक डॉ. वरदा संभूस-पाठक यांनी वारी या विषयावर इंग्रजी भाषेत लिहिलेल्‍या ‘वारी पिलग्रीमेज भक्‍ती, बीइंग अँड बीयॉन्‍ड’ या पुस्‍तकाचे प्रकाशन डॉ. देगलूरकर आणि भारतीय संस्‍कृती संबंध परिषदेचे अध्‍यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे ही त्‍या काळाची आवश्‍यकता होती. त्‍यामुळे त्‍या वेळच्‍या संतांनी आपापले संप्रदाय बाजूला ठेवून सर्वांचा एकच देव म्‍हणजे विठ्ठल हे तत्त्व मान्‍य केले आणि तेव्‍हापासून वारीला आरंभ झाला असे देगलूरकर यांनी सांगितले.

लेखिका डॉ. वरदा संभूस, अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या माजी अध्‍यक्षा अरुणा ढेरे, संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज शिवाजी मोरे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. देवदत्त भिंगारकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जशी निर्मलवारी आयोजित केली जाते, त्‍याच धर्तीवर हरितवारी व्‍हायला हवी, यासाठी पालखी मार्गांवर जास्‍तीत जास्‍त झाडे लावावीत, असे मत यांनी या वेळी व्‍यक्‍त केले.