यंदाच्या वारीमध्ये ‘आनंदडोह’ हा एकपात्री नाट्यप्रयोग दाखवणार !
पिंपरी (जिल्हा पुणे) – श्री क्षेत्र देहूहून पंढरपूरला जाणार्या वारीसह यंदा जगद़्गुरु तुकारामांचे जीवनचरित्र एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. ३३८ व्या पालखी सोहळ्यानिमित्त संवाद, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत वारीच्या मार्गावर अभिनेता योगेश सोमण यांच्या अभियानातून साकारणारा एकपात्री नाट्यप्रयोग ‘आनंदडोह’चे एकूण १५ प्रयोग होणार आहेत. याचा शुभारंभ श्रीक्षेत्र देहू येथील ‘अभंग स्कूल’मध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, वारीच्या मार्गावर वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्यवारी, तसेच ‘आनंदडोह-आनंदवारी’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आजपर्यंत शासनाकडून ११ सहस्र कोटी रुपयांचा निधी पालखी मार्गासाठी उपलब्ध करून दिला आहे. या वर्षीही वारकर्यांना रेनकोट, रहाण्यासाठी तंबू, प्रवासात उपयोगाला येणारी बॅग अशा साहित्याचे वाटप करून पालखीची जय्यत सिद्धता करण्यात आली आहे.