म. गांधी यांना मारण्यामागील नथुराम गोडसे यांची वेदना समजून घ्या !
पूर्वाम्नाय पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे विधान !
रायपूर (छत्तीसगड) – म. गांधी यांना मारल्यावर ‘मला फाशी होईल’, हे नथुराम गोडसे यांना ठाऊक होते, तरीही त्यांनी गांधी यांना मारले. त्यामागे गोडसे यांची वेदना जाणून घेतली पाहिजे की, ते कशामुळे व्यथित होते. त्यांनी लिहिलेले पुस्तक तुम्ही वाचल्यास तुम्हाला ते लक्षात येईल, असे विधान पुरी येथील पूर्वाम्नाय पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी छत्तीसगडच्या दौर्यावर असतांना ‘नथुराम गोडसे हे भारताचे सुपुत्र होते’, असे म्हटले होते. त्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बोलतांना शंकराचार्य यांनी वरील विधान केले.
महात्मा गांधी की हत्या पर बोले शंकराचार्य: निश्चलानंद सरस्वती ने कहा- ‘गोडसे जी’ की वेदना क्या थी उसे समझिए, उनका वक्तव्य मार्मिक था https://t.co/QJi1rv4eZz#Chhattisgarh #shankaracharya pic.twitter.com/q4ePVqIaLR
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 11, 2023
शंकराचार्य म्हणाले की, कुणी कोणते विधान केले, तर त्यावर काही जण सहमत किंवा अहमत असतात. मी जेव्हा गोडसे यांच्याविषयी सांगतो, तेव्हा त्यांच्या ७० पानांच्या पुस्तकाचा संदर्भ देत आहे. हे एक मार्मिक पुस्तक आहे. गोडसे यांच्या विचारांशी मी सहमत आहे कि असहमत हे पाहू नका. त्यांचे पुस्तक नक्की वाचा. कोणत्याही ग्रंथालयात ते मिळेल. ते वाचून तुमचे हृदय स्वीकारेल की, नथुराम व्यथित होते. त्या वेळी भारताला कोणत्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला जात होता, हे पाहिले पाहिजे. गोडसे यांनी त्यात म्हटले आहे की, मी गांधी यांना मारले; कारण त्या व्यक्तीची कूटनीती अधिक काळ चालली असती. त्यामुळे भारताचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते आणि आदर्शही शिल्लक राहिले नसते.
सुसंस्कृत, सुशिक्षित, सुरक्षित संपन्न आणि सेवा हे हिंदु राष्ट्राचे स्वरूप !
हिंदु राष्ट्र आणि राज्यघटना यांविषयी शंकराचार्य म्हणाले की, ज्यांना भारताची राज्यघटना बनवण्याचे श्रेय दिले जाते त्यांनीच या राज्यघटनेची समीक्षा केली होती. त्यांनी संसदेत सांगितले होते की, ते या राज्यघटनेमुळे संतुष्ट नाहीत. तुम्हाला त्यांचे नाव ठाऊक झाले असेल. आम्ही पंतप्रधान आणि राज्यघटना पाहून बोलत नाही. आम्ही म्हणतो की, आपल्या सर्वांचे पूर्वज सनातन काळात हिंदु होते. यावर तुम्ही असहमत असाल, तर सांगा. सुसंस्कृत, सुशिक्षित, सुरक्षित संपन्न आणि सेवा हे हिंदु राष्ट्राचे स्वरूप आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. मला कुठेही अडकवण्याचा प्रयत्न करू नका. पंतप्रधान माझ्याकडे येतात. या राज्याचे मुख्यमंत्री माझ्याकडे येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.