(म्हणे) ‘इंदिरा गांधी यांच्या हत्येचा देखावा प्रदर्शित करणे हा कॅनडात गुन्हा नाही !’ – कॅनडातील ब्रॅम्पटन शहराचे महापौर

कॅनडातील ब्रॅॅम्पटन शहराच्या महापौरांचे भारतविरोधी विधान !

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये ४ जून या दिवशी शिखांकडून ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला ३९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक फेरी काढण्यात आली होती. (जून १९८४ मध्ये अमृतसरच्या सुवर्णमंदिरात लपलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांवर सैन्याने केलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ असे नाव देण्यात आले होते.) या फेरीमध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी केलेल्या हत्येचा देखावा बनवण्यात आला होता. यावर टीका होऊ लागल्यानंतर आता कॅनडातील ब्रॅम्पटन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी देखाव्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, भारताच्या माजी पंतप्रधानांच्या हत्येचा देखावा फेरीमध्ये दाखवणे, ही घटना कॅनडाच्या कायद्यांनुसार गुन्हा ठरत नाही.

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी या देखाव्याच्या प्रकरणी यापूर्वीच स्पष्ट करत म्हटले होतेे, ‘ही घटना दोन्ही देशांतील संबंधांसाठी चांगले नाही.

’ त्यानंतर भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमरन मॅके यांनी ट्वीट करून खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, कॅनडामध्ये द्वेष आणि हिंसा यांना उदो उदो करण्याला कोणतीही जागा नाही. (असे केवळ वक्तव्य करून काय उपयोग ? ते कॅनडा सरकारच्या कृतीतून दिसायला हवे ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

कॅनडा म्हणजे खलिस्तान्यांचे माहेरघर झाले आहे. तेथील केवळ सरकारच नव्हे, तर अनेक राजकारणी खलिस्तान्यांचे समर्थन करत आहेत. तेथील खलिस्तानवाद संपवण्यासाठी भारताने कॅनडावर दबाव निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !