सांगवी येथील चि. अच्युत बंकापूर (वय १ वर्ष) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर ही एक आहे !
पुणे – नवी सांगवी येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय १ वर्ष) याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे पुणे येथील सनातनच्या या १२३ व्या या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी १३ मे २०२३ या दिवशी एका ऑनलाईन सत्संगात घोषित केले. या वेळी चि. अच्युतचे वडील श्री. स्वयंप्रकाश बंकापूर आणि आई सौ. अमूल्या बंकापूर, तसेच सांगवी येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पद्मा लोणे आणि अन्य काही साधकही उपस्थित होते. ही आनंदाची वार्ता ऐकून चि. अच्युतच्या आई-वडिलांची भावजागृती झाली.
(अच्युत नावाचा अर्थ : अच्युत हे श्रीविष्णूचे एक नाव आहे.)
सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ |
चि. अच्युत बंकापूर याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. जन्मापूर्वी
१ अ. नारायण-नागबली विधी आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप केल्यानंतर गर्भधारणा होणे : ‘विवाहानंतर आम्ही बाळ होण्यासाठी प्रयत्न करतांना पुष्कळ अडचणी आल्या. वैद्यकीय उपचार करूनही यश मिळत नव्हते. ‘आता आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करायला हवे’, असे मला वाटले. त्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे जाऊन नारायण-नागबली विधी केले. तसेच आम्ही ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत होतो. विधी झाल्यानंतर १५ दिवसांनी मी ‘गर्भवती राहिले आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले.
१ आ. सातवा मास
१ आ १. घरातील भिंतीवर लावलेले श्रीकृष्णाचे मोठे छायाचित्र अकस्मात् पडणे, यावरून ‘देवाने येणारे संकट स्वतःवर घेतले’, असे वाटणे : गरोदरपणात मी प्रतिदिन गणपति स्तोत्र, रामरक्षा आणि विष्णुसहस्रनाम ऐकत असे. तसेच मी नामजपही करत असे. एक दिवस घरातील भिंतीवर लावलेले श्रीकृष्णाचे मोठे छायाचित्र अकस्मात् पडले. त्या वेळी छायाचित्राचे ‘लॅमिनेशन’ फाटले; मात्र श्रीकृष्णाच्या चित्राला काही झाले नाही. तेव्हा ‘कोणते तरी संकट देवाने स्वतःवर घेतले आहे’, असे मला वाटले.
१ आ २. बाहेरचे पदार्थ खावेसे वाटले, तरी ते टाळता येणे : गर्भवती असतांना मला बाहेरचे पदार्थ खावेसे वाटत होते. तेव्हा मी गर्भातील जिवाला ‘बाहेरचे अन्न खाल्ल्याने आपल्याला त्रास होणार आहे. घरातील अन्न सात्त्विक आणि चैतन्यदायी आहे. त्यातच आपल्याला समाधानी आणि आनंदी रहायचे आहे’, असे सांगायचे. अनेक वेळा असे घडले की, ‘एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यावर कुणीतरी तो पदार्थ खायला आणून देत असे.’ त्यामुळे देवाप्रती कृतज्ञता व्यक्त व्हायची.
१ इ. नववा मास
१ इ १. ‘सात्त्विक जीव आपल्या अवती-भोवतीचे वातावरण बदलून टाकतो’, असे जाणवणे : या कालावधीत माझे सासू-सासरे (सौ. पुष्पांजली दत्तात्रय बंकापूर (वय ६१ वर्षे), सौ. दत्तात्रेय बंकापूर (वय ६८ वर्षे)) आणि माझी आई (सौ. शालिनी नानाजी ठेंगरे (वय ६९ वर्षे)) पारायण अन् नामजप करण्याचा प्रयत्न करत असत. त्या वेळी ‘सात्त्विक जीव आपल्या अवती-भोवतीचे वातावरण बदलून टाकतो’, याची मला जाणीव झाली.
१ ई. प्रसुतीच्या वेळी
१ ई १. प्रसुतीच्या वेळी रुग्णालयातील वातावरण सात्त्विक वाटणे, तसेच त्या वेळी बहीण, आई आणि यजमान यांनी नामजप करणे : मी रुग्णालयातील ज्या खोलीत होते, तेथील वातावरण आश्रमाप्रमाणे होते. जन्माच्या दिवशी मला आधुनिक वैद्यांनी कळ येण्याचे औषध दिल्यावर पहाटे ४ वाजता कळ यायला आरंभ झाला. त्या वेळी माझी बहीण (श्रीमती मनीषा ठेंगरे, आई आणि यजमान (श्री. स्वयंप्रकाश बंकापूर) नामजप करत होते. खोलीमध्ये नामजप करतांना बहीण आणि यजमान यांचे लगेच ध्यान लागत होते. माझे यजमान आणि माझे भाओजी (श्री. अमित दिलीप चौधरी) न्याहरी आणायला बाहेर गेल्यावर तेथे एका अनोळखी स्त्रीने दोघांच्या हातात मोगर्याची फुले ठेवली. तेव्हा यजमानांना ‘गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) प्रसाद हातात घेतला आहे’, असे जाणवले.
१ ई २. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मतिथीच्या दिवशी बाळाचा जन्म होणे : आधुनिक वैद्यांनी माझ्या प्रसुतीचा दिनांक दिला होता. त्याच्या दुसर्या दिवशी गुरुदेवांची जन्मतिथी होती. ‘सच्चिदानंद परब्रह्म यांचा जन्मदिवस आहे, त्याच दिवशी बाळाचा जन्म व्हावा’, असे मला सारखे वाटत होते. चि. अच्युतचा जन्म आम्हा दोघांचे श्रद्धास्थान परात्पर गुरुदेवांच्या जन्मतिथी दिवशी झाला. त्याचे जन्मनाव काढतांना ‘गु’ असा शब्द आला. त्यामुळे गुरुजींनी गुरूंशी संबंधित नाव ठेवायला सुचवले. त्यामुळे ‘हे गुरुदेवांचे बाळ आहे’, याची प्रचीती मिळाली आणि कृतज्ञता वाटली.
२. जन्मानंतर
२ अ. पहिला मास
२ अ १. झोपेत मुद्रा करणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी सेवा करत असतांना बाळाने कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. त्या वेळी तो केवळ सव्वा मासाचा होता. बर्याचदा ‘तो झोपतांना मुद्रा करून ध्यानावस्थेत झोपला आहे’, असे मला जाणवायचे.
२ अ २. नामकरण विधीवत् होणे : बाळाचे नामकरण विधीवत् करायचे ठरवले होते; मात्र पुष्कळ प्रयत्न करूनही आम्हाला एकही पुरोहित मिळाला नाही. बारश्याच्या ३ दिवस आधी श्री. आशिष क्षीरसागर या साधकांना संपर्क झाला. त्यांना विचारल्यावर ते आले आणि नामकरण विधी त्यांच्या हस्ते विधीवत् झाला. विधी होत असतांना आम्हाला पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘गुरुदेवांनी साधक पुरोहितांना पाठवले’, असे वाटून कृतज्ञता जाणवली.
२ आ. दुसरा मास
२ आ १. किड्यांच्या माध्यमातून त्रास होणे :
गावाकडे असतांना अच्युत खेळतांना अकस्मात् मोठ्याने रडायचा. त्या वेळी ‘त्याला वेगवेगळे त्रास होत आहेत’, असे मला जाणवत असे. एक दिवस रात्री अकस्मात् पुष्कळ मोठ्या संख्येने देवघरामध्ये दिव्यावरती येणारे किडे (उधळी) येऊन पडले. तसेच आम्ही झोपायचो तिथे २ वेळा उंदीर मरून पडले होते.
२ इ. आठवा मास
२ इ १. हसतमुख : तो प्रत्येकाकडे बघून हसतो आणि सर्वांना आपलेसे करून घेतो.
२ इ २. सात्त्विक पोशाखाची आवड : त्याच्या आजीने किंवा त्याला बाहेर फिरायला घेऊन गेल्यावर कोणत्याही इतर काकूंनी साडी परिधान केली असेल, तर अच्युत त्यांच्याकडे जाण्यासाठी झेप घेतो.
२ इ ३. सात्त्विकतेची आवड : तो साधकांकडे जाण्यासाठी लगेच झेप घेतो. त्याला भजन म्हटले, तर आनंद होतो आणि आरती म्हटली, तर तो देवघराकडे पाहून टाळ्या वाजवतो.
२ इ ४. गणेशतत्त्व असल्याचे जाणवणे : बर्याच लोकांनी सांगितले की, ‘अच्युतचे कान आणि मांडी घालून बसणे’, हे गणपतीप्रमाणे आहे.’ त्यामुळे ‘त्याच्यामध्ये गणेशतत्त्व आहे’, असे मला जाणवते.’
– सौ. अमू्ल्या स्वयंप्रकाश बंकापूर (अच्युतची आई, पूर्वाश्रमीची कु. ज्योती नानाजी ठेंगरे) आणि श्री. स्वयंप्रकाश प्रभाकर बंकापूर (अच्युतचे वडील)
२ ई. आनंदी आणि हसतमुख : ‘तो आजूबाजूला असतांना वातावरण आनंदी असते. ओळखीचे किंवा अनोळखी असलेले कुणीही त्याला घेतले, तर तो त्यांच्याकडे बघून गोड हसतो आणि थोडा वेळ तरी त्यांच्याकडे जातो. यावरून ‘त्याला इतरांना आनंद द्यायला आवडते’, असे मला वाटते.’ – श्रीमती मनीषा ठेंगरे (अच्युतची मावशी), गडचिरोली (२०.४.२०२३)
३. स्वभावदोष : चिडचिड करणे, हट्ट करणे.’
– सौ. अमू्ल्या स्वयंप्रकाश बंकापूर (अच्युतची आई, पूर्वाश्रमीची कु. ज्योती नानाजी ठेंगरे) आणि श्री. स्वयंप्रकाश प्रभाकर बंकापूर (अच्युतचे वडील)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |