गोवा : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हणजुणे पंचायतीकडून १७५ अनधिकृत बांधकामांना नोटीस
सर्व अनधिकृत बांधकामे किनारा नियंत्रण क्षेत्रात
म्हापसा, १० जून (वार्ता.) – किनारा नियंत्रण क्षेत्रात बांधकामे केलेल्या १७५ जणांना १० जून या दिवशी हणजुणे-कायसुवा पंचायतीने अनधिकृत बांधकामे केल्यावरून नोटीस बजावली आहे. पंचायतीने पंचायत राज कायद्याप्रमाणे बांधकामे आहेत का ? हे पहाण्यासाठी सर्वांना बांधकाम अनुज्ञप्ती किंवा पंचायतीने बांधकामासाठी दिलेली अनुज्ञप्ती असल्यास ती पुढील ५ दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे. उच्च न्यायालयाने अशा अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील एका याचिकेवर सुनावणी करतांना २६ एप्रिल २०२३ या दिवशी दिलेल्या आदेशानुसार पंचायतीने हे पाऊल उचलले आहे. (स्वतः कारवाई करणे दूरच, वरून उच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर दीड मासांनंतर नोटीस जारी करणारी सुस्त पंचायत ! – संपादक)
पुढील ५ दिवसांत योग्य ती कागदपत्रे सादर न केल्यास पंचायत अनधिकृत बांधकामे करणार्या मालकांच्या विरोधात गोवा पंचायत राज कायद्यानुसार कारवाई करणार, असे पंचायतीने नोटिसीत म्हटले आहे. ही सार्वजनिक नोटीस (सूचना) https://digitalgoa.com/anjuna-panchayat-ndz/ यावर उपलब्ध आहे.
संपादकीय भूमिकान्यायालयाने आदेश दिल्यानंतर नोटीस पाठवणारी हणजुणे पंचायत किनारा नियंत्रण क्षेत्रात १७५ बांधकामे होत असतांना काय करत होती ? अनधिकृत बांधकामे करणार्यांशी पंचायतीचे साटेलोटे आहे का ? कि पंचायत निष्क्रीय आहे ? |