मुलांनो, मातृभाषेचा अभिमान कसा वाढवाल ?

काही मुले आईला ‘मम्मी’ किंवा ‘मॉम’ आणि बाबांना ‘डॅडी’ किंवा ‘डॅड’ अशी हाक मारतांना तुम्ही ऐकले असेल. ‘मम्मी’ किंवा ‘डॅडी’ हे शब्द ऐकायला चांगले वाटतात का ? नाही ना; कारण एकच आणि ते म्हणजे ‘आई’ किंवा ‘बाबा’ या शब्दांतील प्रेम त्या इंग्रजी शब्दांतून व्यक्त होत नाही. स्वभाषाभिमान वाढवण्यासाठी तुम्हीही ‘आई’ आणि ‘बाबा’ अशीच हाक मारा, तसेच पुढील कृतीही करण्याचा प्रयत्न करा !

१. मोठ्या बहिणीला ‘दीदी’ आणि काकांना ‘अंकल’ अशी हाक न मारता अनुक्रमे ‘ताई’ आणि ‘काका’ असे म्हणा !

२. स्वतःचे नाव जी.डी. भोसले, एस्.एम्. जोशी, ए.एस्. कदम अशा प्रकारे सांगू नका. या इंग्रजी आद्याक्षरांनी गुरुदास, शिवानंद, आरती अशासारख्या तुमच्या अर्थपूर्ण नावांचा बोध होत नाही. त्यामुळे स्वतःचे नाव सांगतांना पूर्ण नाव, नाहीतर मराठी आद्याक्षरे सांगा ! पुस्तके, वह्या आदींवरही ‘एम्.व्ही. पंडित’ असे नव्हे, तर कु. मोक्षदा वसंत पंडित/कु. मोक्षदा पंडित/कु. मो.व. पंडित असे लिहा !

३. शाळेच्या ओळखपत्रावर किंवा अन्यत्र स्वाक्षरी मातृभाषेत करा !

४. मित्र/मैत्रीण यांच्याशी दूरभाषवर वा भ्रमणभाषवर (‘मोबाईल’वर) बोलतांना ‘हॅलो’ नव्हे, तर ‘नमस्कार’ म्हणा !

५. सण, नववर्ष आदींच्या शुभेच्छा मराठीत द्या, उदा. ‘हॅपी दिवाली’ नव्हे, तर ‘दीपावलीनिमित्त शुभेच्छा !’ असे म्हणा ! गुढीपाडव्याला ‘हॅपी न्यू इयर’ नव्हे, तर ‘नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !’ असे म्हणा !

६. मराठी भाषेत लिहितांना इंग्रजी लेखनपद्धतीनुसार रेषेच्या वर नव्हे, तर रेषेखाली लिहा आणि सर्वच शब्दांना शीर्षरेषा द्या !

७. घरचे दूरभाष / भ्रमणभाष क्रमांक सांगतांना इंग्रजीत नव्हे, तर मराठीत सांगा, तसेच अन्य कुणाचे क्रमांक लिहून घेतांना मराठी अंकांतच लिहून घ्या !

८. ‘गुड मॉर्निंग’ नव्हे, तर ‘सुप्रभात’ म्हणा आणि ‘गुड नाईट’ नव्हे, तर ‘शुभ रात्री’ असे म्हणा ! (तथापि ‘सुप्रभात’ किंवा ‘शुभ रात्री’ असे म्हणायची हिंदु संस्कृती नाही. आपण स्वभाषेत ‘सुप्रभात’ किंवा ‘शुभ रात्री’ हे शब्द उच्चारत असलो, तरी एक प्रकारे ते परकियांच्या प्रथेचे अनुकरण असावे.)

९. बाहेर जाणार्‍या व्यक्तीला निरोप देण्यासाठी हात हालवून ‘टाटा’ किंवा ‘बाय’ म्हणू नका. निघतांना त्यांना नमस्कार करा आणि ‘पुन्हा या’ किंवा ‘लवकर या’, असे म्हणा !

१०. दिनांक लिहितांना इंग्रजी नव्हे, तर हिंदु कालगणनेचा वापर करा, उदा. चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा), कलियुग वर्ष ५११४ (२३.३.२०१२)

११. राष्ट्राभिमान व्यक्त करण्यासाठी ‘इन्कलाब झिंदाबाद !’ नव्हे, तर ‘वन्दे मातरम् ।’ ही घोषणा द्या ! (‘इन्कलाब’ आणि ‘झिंदाबाद’ हे शब्द अनुक्रमे अरबी आणि फारसी या भाषांतील आहेत.)

१२. मित्र-मैत्रिणींना हाक मारतांना इंग्रजी भाषेतील आद्याक्षरांनी हाक मारू नका, उदा. मित्राचे नाव कु. संजय सखाराम परब असे असल्यास त्याला ‘एस्.एस्.’ असे म्हणू नका !

१३. ‘संदीप’ नावाच्या मित्राला ‘सँडी’ अशी हाक मारणे टाळा !

१४. मनासारखी घटना घडली की, हात वर करून वा मुठी आवळून ‘येऽऽस्स’ असे म्हणू नका; अशा वेळी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !

१५. मराठीत बोलतांना आणि लिहितांना परकीय शब्द न वापरता मराठी शब्दच वापरा !

(संदर्भ – balsanskar.com)