रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे विहिरीमध्ये आढळले मृत मासे !
लोटे येथील संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्याची संतप्त ग्रामस्थांची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी
रत्नागिरी – खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये आस्थापनांकडून वारंवार रसायनमिश्रित दूषित पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे दाभोळ खाडी आणि लोटे परिसरातील विहिरींमध्ये जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. असाच प्रकार ९ मे या दिवशी सकाळी आढळून आला. येथील उद्योजक राजेंद्र आंब्रे यांच्या विहिरीमध्ये मृत मासे आढळून आले आहेत. परत परत होणार्या या प्रकारांमुळे येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे रसायनमिश्रीत दूषित पाणी सोडणार्या संबंधित आस्थापनांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी श्री. आंब्रे आणि लोटे येथील ग्रामस्थ यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे, असे वृत्त दैनिक ‘प्रहार’ने प्रसिद्ध केले आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक आस्थापने त्यांच्याकडील रसायनमिश्रित दूषित पाणी परिसरातील नाल्यांमध्ये सोडतात. हेच पाणी पाळीव आणि अन्य जनावरे पीत असल्यामुळे पूर्वी अनेक गुरे दगावली आहेत. याविषयी संबंधित आस्थापने आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ग्रामस्थांनी निवेदनेही दिली आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाणूनबुजून या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी अनेक वेळा केला आहे. (प्रदूषण मंडळाला जाग केव्हा येणार ? जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्या प्रदूषण मंडळाचा पांढरा हत्ती जनतेच्या पैशांतून का म्हणून पोसायचा ? – संपादक)
नुकत्याच झालेल्या या घटनेची माहिती श्री. आंब्रे यांनी तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण येथील कार्यालयामध्ये दूरध्वनीद्वारे दिली आहे. त्यानंतर येथील अधिकार्यांनी घटनास्थळी येऊन पहाणी करण्याचे आश्वासन दिले.
संपादकीय भूमिकाअशी मागणी जनतेला पुन:पुन्हा का करावी लागते ? खरेतर प्रदूषण नियंत्रण मंडळानेच या समस्येवर ठोस उपाययोजना काढायला हवी ! |