आजच्या पिढीतील संस्कारहीनता दर्शवणारी काही उदाहरणे !
१. एकदा आगगाडीत बसलेली २ लहान मुले आपल्या आई-वडिलांसमवेत खेळत होते. खेळता खेळता त्यातील एका मुलाने ठोसा लगावल्याप्रमाणे हाताची मूठ वडिलांसमोर धरली. काही मिनिटांनी दुसर्या मुलाने वडिलांच्या तोंडाच्या दिशेने बंदूक धरल्याची कृती करून गोळी मारल्याप्रमाणे केले. आई-वडिलांपैकी कुणीही त्या मुलांना ओरडले नाही, उलट ते मुलांना हसून प्रतिसाद देत होते. – सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल
२. एका महिलेने ८ जीबीचे नवीन डेटाकार्ड आणले आणि दुकानदाराला त्या कार्डमध्ये चित्रपटातील नवीन गाणी, चलत्चित्रे (व्हिडिओ), कार्टून इत्यादी भरून देण्यासाठी सांगितले. तिच्या १० ते १२ वर्षांच्या मुलाने ही मागणी केली असल्याचे नंतर समजले.
३. एका वडिलांनी १० वर्षीय मुलाला काही पैसे देऊन शेजारील दुकानातून खाऊ आणावयास सांगितला. त्यातील २० रुपये उरत असल्याने मुलानेही ते न विचारताच स्वतःकडेच ठेवले.
४. एका मुलाने जेवतांना स्वतःच दूरचित्रवाणीवर कार्टून लावले आणि तेच पहात बसला. जेवणाकडे दुर्लक्ष करून कार्टून पहाण्याकडेच त्याचे अधिक लक्ष होते.
५. एका ठिकाणी १४ – १५ वर्षे वयाच्या मुलीची आई आणि आजी तिला घरातले एक काम करण्यासाठी पुष्कळ वेळा सांगत होत्या. ओरडून सांगितले, तरीही ती मुलगी ऐकत नव्हती आणि नीट उत्तरही देत नव्हती. तिचे वडील शेजारीच बसलेले होते. शेवटी त्या मुलीने रागाने आईला उलटे उत्तर दिले, ‘‘मी नाही करणार.’’ यावर वडील लगेचच मुलीचे कौतुक करत म्हणाले, ‘‘माझी ही मुलगी ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ (आधुनिक विचारांची) आहे.’’
६. उत्तरप्रदेशातील एका मुलाने त्याला पबजी खेळण्यास विरोध करणार्या आईची हत्या केली. आईचा मृतदेह घरात ३ दिवस पडून होता आणि मुलगा पबजी खेळ खेळण्यात मग्न होता.