शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान !
|
छत्रपती संभाजीनगर – शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने १० जून या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी ९ जूनपासून शहरात येत होते. पालखी सोहळ्याचे यंदा ४२५ वे वर्ष असून पालखी सोहळ्याच्या रथाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. पालखी ओटा आणि परिसर यांचा विकास झाल्यानंतर प्रथमच येथून पालखी प्रस्थान करणार आहे. यामुळे यंदाचा वारकर्यांचा अनुभव वेगळा रहाणार आहे.
याविषयी पालखी प्रमुख रघुनाथबुवा गोसावी म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर, नगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर अशा ५ जिल्ह्यांतून पालखी मार्गक्रमण करणार आहे. पंढरपूरपर्यंत एकूण १८ मुक्काम करून पायी दिंडी सोहळा २८ जून या दिवशी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरला पोचणार आहे. नाथांच्या वारकर्यांच्या जवळपास ९० दिंड्या नाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. २० सहस्रांहून अधिक वारकरी महिला आणि पुरुष २६० किलोमीटरचे अंतर पायी पार करून पंढरपूर येथे पोचतात. पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर मिडसावंगी, पारगाव घुमरे, नांगरडोह, कव्हेदंड आणि पंढरपूर अशा ५ ठिकाणी ‘रिंंगण सोहळे’ होणार आहेत. २७ जून या दिवशी होळे येथील भीमा नदी पात्रात नाथांच्या पादुकांचा स्नान सोहळा होणार आहे, तसेच २९ जून या दिवशी पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांची विठ्ठल मंदिरात समाधी आहे. २ जुलै या दिवशी मंदिरात परंपरागत पद्धतीने भानुदास महाराज पुण्यतिथी साजरी करून पालखी सोहळा परतीच्या प्रवासास रवाना होणार आहे.