मुलांचे संगोपन म्हणजे त्यांचे लाड करणे नव्हे !
सकाळी नित्यकर्म आटोपल्यावर देवासमोर हात जोडायला उभे रहाणारी लहान मुले अभावानेच आढळतील, अशी बिकट स्थिती आहे. या कृतीऐवजी त्यांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ? हे पालकांना समजत नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. बालपणापासून मुलांचे लाडच एवढे पुष्कळ केलेले असतात की, ‘त्यांना हे करू नको’, असे सांगण्यासही पालक धजावत नाहीत. मुलांना पालकांचा धाक असायला पाहिजे; पण सध्या मात्र पालकांनाच मुलांचा धाक असल्याचे निदर्शनास येत आहे. पुढे जाऊन हीच मुले पुष्कळ आगाऊ होतात आणि स्वतःला वाटेल तेच करतात. परिणामी पालक त्यांच्यामुळे कायम त्रस्त रहातात आणि मुले त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने मौजमजा करण्यात दंग रहातात. त्यामुळे ‘हेच खरे जीवन आहे’, असा त्यांचा भ्रम होतो. ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’, असे सुवचन आहे. ती घरी असल्यावर निश्चितच चांगले वाटते; पण त्यांच्या बालमनावर ‘संस्कार’ करून ती फुले टवटवीत ठेवण्याचे दायित्व पालकांचे आहे. मुलांच्या बालमनाला योग्य वळण लावण्याऐवजी केवळ ‘त्यांचे लाड करणे म्हणजे संगोपन’, असा अयोग्य दृष्टीकोन ठेवल्यास त्यांना हट्टी बनण्यासाठी पोषक वातावरण बनवले जात आहे.
– श्री. जयेश राणे, मुंबई