येरवडा (पुणे) कारागृहात बंदीवानांसाठी अधिकृत ‘फोन बूथ’ सुविधा
पुणे – येरवडा मध्यवर्ती कारागृहातील भ्रमणभाषचा अनधिकृत वापर थांबवण्यासाठी बंदीवानांना अधिकृत दूरध्वनी सुविधा (टेलिफोन बूथ) चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा देण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील सर्व कारागृहांमध्ये ‘फोन बूथ’ चालू करण्यात येणार आहेत. बंदीवानांकडे भ्रमणभाष सापडल्याच्या काही घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समजते.
पुढील सप्ताहामध्ये येरवडा कारागृहात ३० ‘फोन बूथ’ चालू करण्यात येतील. ‘मकोका’ आणि ‘गंभीर’ गुन्ह्यातील बंदीवानांनाही ही सुविधा देण्याचा विचार केला जाईल. दूरध्वनी सुविधा अधिकृतपणे चालू झाल्यानंतर अनधिकृत भ्रमणभाषचा वापर थांबेल. या ‘फोन बूथ’सह बंदीवानांच्या भेटीची वेळ वाढवण्याचाही निर्णय घेतला जाईल, असे राज्य कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाकारागृह प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय |