नव्या विश्वस्त मंडळाला धर्मादाय आयुक्तांनी दिली अनुमती !
जेजुरीकरांच्या लढ्याला यश
पुणे – जेजुरी संस्थानमधील विश्वस्तपदांच्या नियुक्तीवरून संघर्ष करावा लागल्यानंतर जेजुरीकरांच्या लढ्याला यश मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार, जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदी जेजुरीतील ५ ग्रामस्थ आणि बाहेरच्या ५ जणांची नियुक्ती होणार आहे. एकूण विश्वस्तांपैकी ६ जण जेजुरी गावचे, तर इतर ५ जण हे जेजुरी बाहेरचे असतील. धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्तांनी आंदोलक ग्रामस्थांच्या मागणीवर सुनावणी घेतल्यानंतर नव्या विश्वस्त मंडळाला अनुमती दिली आहे. विश्वस्त मंडळात स्थानिकांना डावलण्यात आल्याने स्थानिक खांदेकरी आणि नामकरी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना स्थानिकांची आहे. त्यासाठी जेजुरीकरांनी आंदोलन पुकारले होते.
सौजन्य एबीपी माझा
जेजुरी संस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यातील वाद चिघळल्यानंतर यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी जेजुरीच्या ग्रामस्थांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांना हे सूत्र पटवून देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून स्थानिकांना न्याय देण्याची ग्वाही राज ठाकरेंनी दिली होती. विश्वस्तांमध्ये ४ लोकांची वाढ करण्यासाठीही ते प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.