धुळे येथे १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘जनआक्रोश मोर्चा’ !

श्रीरामाच्या मूर्तीच्या विटंबनेच्या विरोधात हिंदूंची संघटित प्रतिक्रिया !

धुळे – छत्रपती संभाजीनगर (मोगलाई) भागातील श्रीरामाच्या मूर्तीची आणि मंदिराची विटंबना केल्याच्या निषेधार्थ १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी १० जून या दिवशी सकाळी भव्य मोर्चा काढून त्याचा निषेध नोंदवला आणि ‘संघटनशक्तीने प्रत्युत्तर दिल्यास विटंबना करणार्‍यांचे खरे नाही’, असा जणू संदेशच दिला ! ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘जनआक्रोश मोर्च्या’च्या माध्यमातून प्रचंड मोठ्या संख्येने हिंदू एकत्र येऊन त्यांनी स्थानिक श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या विटंबनेचा निषेध नोंदवला. सर्वत्रच्या हिंदूंना‘हिंदू आता आघात खपवून घेणार नाहीत’, अशी कृतीशील होण्याची प्रेरणाच या मोर्च्याद्वारे देण्यात आली.

६ जून या दिवशी येथील राममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीचे मुख दुखावण्यात आले, तसेच मंदिरात दारूच्या बाटल्याही मिळाल्या. त्यानंतर सर्व हिंदूंनी तातडीने एकत्र येऊन ७ जून या दिवशी एक बैठक घेतली. यामध्ये अन्य वक्त्यांसमवेत हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनीही प्रबोधन केले. या बैठकीस शेकडो हिंदू उपस्थित होते. मोर्च्यात हिंदूंना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्याकरता एक छोटी चित्रफीत सिद्ध करण्यात आली होती.

जनआक्रोश मोर्च्यात सहभागी झालेले सहस्रावधी हिंदू

मोर्च्यामध्ये ‘दोषींना कडक शिक्षा झालीच पाहिजे’, ‘आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा अनेक क्षात्रभावपर घोषणांनी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि ‘जय श्रीराम जय श्रीराम’ असा रामनामाचा जयघोष यांनी धुळे शहर दुमदुमून गेले होते. हिंदूंनी भगव्या टोप्या, भगवे उपरणे आणि भगवी वस्त्रे धारण केल्याने, तसेच भगव्या ध्वजांमुळे सहस्रो हिंदूंच्या मोर्च्याने धुळ्यातील रस्ते भगवेमय होऊन गेले. या मोर्च्यात श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या हार-फुलांनी सजवलेल्या सुंदर मूर्तीही होत्या. हिंदूंनी काळे फलक हातात घेतले होते. त्यावर विटंबनेवरील निषेधाचे लिखाण करण्यात आले होते.

प्रभु श्रीरामाच्या आरतीने मोर्च्यास प्रारंभ झाला. मोर्च्याच्या शेवटी ‘१४ जून या दिवशी श्रीरामाच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल’, अशी घोषणा भाजपचे श्री. अनुप अग्रवाल यांनी केली. १० जून या दिवशी स्थानिकांनी धुळे बाजार उत्स्फूर्तपणे बंद ठेवला होता.

या मोर्च्यासाठी ९ जूनपासूनच शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सध्या शहरात १४४ कलम लागू करण्यात आले असून अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

संपादकीय भूमिका

धर्मश्रद्धा दुखावल्यावरून धुळ्यातील हिंदूंनी दाखवलेले भव्य संघटन अभिनंदनास्पदच आहे. सर्वत्रचे हिंदू अशा प्रकारे संघटित झाले, तर हिंदूंच्या विरोधात काही करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही ! या माध्यमातून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायलाही वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्या !