गोवा : उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल सुपुर्द करण्यासाठीच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ
पणजी, ९ जून (वार्ता.) – पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी सरकारच्या पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याने तज्ञांचा समावेश असलेल्या ५ सदस्यीय समितीची जानेवारी २०२३ मध्ये स्थापना केली होती. समितीने तिचा अहवाल १२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत शासनाला सुपुर्द करायचा होता. २ दिवसांपूर्वी मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल सरकारला सुपुर्द करण्यास समितीने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत मागितली होती. तिची ही मागणी मान्य करत सरकारने अहवाल सादर करण्यास मुदत फेब्रुवारीपासून १० मासांनी वाढवून दिली आहे.
लोकांनी एकूण १९ प्रकरणे समितीच्या निर्शनास आणून दिली आहेत. समितीने यातील सुमारे ७-८ प्रकरणांत संबंधित ठिकाणी जाऊन पहाणी केली आहे. चोडण येथे पूर्वी श्री देवकीकृष्ण मंदिर होते आणि चोडण येथे समितीला या मंदिराचे अवशेष सापडले आहेत. गोव्याच्या संग्रहालय खात्याकडे देवतांच्या अनेक पाषाणाच्या मूर्ती आहेत. जुने गोवे येथे असलेल्या केंद्रीय संग्रहालयामध्येही देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती कोणत्या मंदिरांच्या आहेत, त्याचा इतिहास शोधून काढायला पाहिजे. पुरातत्व विभागाच्या कागदपत्रांमध्ये ८०० ते १ सहस्र मंदिरे उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे. पोर्तुगिजांनी मंदिरे उद्ध्वस्त केल्यानंतर त्यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये तोडण्यात आलेल्या सर्व मंदिरांची माहिती आहे. या सर्व कागदपत्रांचा अभ्यास करून त्याची अहवालात नोंद करावी लागणार आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
हिंदूंच्या मंदिरांचे संवर्धन आवश्यकच ! – संदेश साधले
पणजी – हिंदूंच्या मंदिरांचे संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंदिरांच्या संवर्धनाविषयी केलेले विधान स्वागतार्ह आहे. राज्यातील मंदिरांची पुनर्बांधणी भाजपच्या सरकारने करावी, तसेच नष्ट झालेल्या पायाभूत सुविधाही उभाराव्यात, असे गोवा भाजप प्रसारमाध्यम विभागाचे समन्वयक संदेश साधले यांनी म्हटले आहे.
आग्वाद किल्ल्यावर शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंदिरे नष्ट करणार्या पोर्तुगीज राज्यकर्त्यांच्या खुणा पुसून टाकण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर साधले यांनी वरील प्रतिक्रिया दिली. संदेश साधले पुढे म्हणाले की, गोव्यातील मंदिरे आणि देवालये हिंदु संस्कृतीची संचिते आहेत. भावी पिढ्यांसाठी आपल्या संचिताचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. पोर्तुगिजांच्या खुणा मिटवून टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.