‘परात्पर गुरुदेवांनी एकदा साधकाचा हात धरल्यावर ते त्याचा उद्धार करणार आहेत’, याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती
‘पूर्वी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत होते. काही कारणास्तव मला घरी जावे लागले. आमचा मळणी यंत्र सिद्ध करण्याचा कारखाना आहे. त्यामुळे घरी पुष्कळ ग्राहक येतात. मी वडिलांना कारखान्याच्या कामात साहाय्य करते. मी ‘सव्यसाची गुरुकुलम्’ या संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्या योगासने आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण या वर्गांना जात असे. तेव्हा मी सेवेच्या माध्यमातून अनुभवलेल्या गुरुकृपेविषयी पुढे दिले आहे.
१. प्रचाराची सेवा केली नसतांना घरी आलेल्या ग्राहकांना साधनेविषयी सांगता येणे आणि त्या वेळी ‘देवच माझ्या माध्यमातून बोलून घेत आहे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापासून कितीही दूर गेले, तरीही त्यांनी हात सोडला नाही’, याची जाणीव होणे
मी कधी प्रचारसेवा केली नाही. माझ्याकडून लोकांना साधनेविषयी माहिती सांगण्याचा विचार कधी झाला नाही. आमच्या घराबाहेर ‘येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने मिळतील’, असा फलक लावला आहे. तो फलक वाचून अनेक जण सनातन सांगत असलेल्या साधनेविषयी विचारायचे. त्या वेळी मी घरी एकटी असतांना ‘लोकांना साधनेविषयी माहिती कशी सांगायची ?’, याचा विचार केल्यावर मला काही सुचायचे नाही; मात्र घरी आलेल्या व्यक्तीने माहिती विचारल्यावर माझ्याकडून त्यांना आपोआप माहिती सांगितली जायची. त्या वेळी ‘मी इतके कसे काय सांगू शकले ?’, हे मलाच कळायचे नाही. तेव्हा ‘देवच माझ्या माध्यमातून बोलून घेत आहे. मी गुरुदेवांपासून (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापासून) कितीही दूर गेले, तरीही त्यांनी माझा हात सोडला नाही’, याची मला जाणीव झाली.
२. घरी असतांनाही सेवा करण्याची संधी मिळणे आणि ‘त्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले माझा उद्धार करत आहेत’, याची जाणीव होणे
मी आश्रमातून घरी आल्यावर प्रासंगिक सेवा करत होते. अन्य वेळी माझा वेळ वाया जात होता. त्या कालावधीत रामनाथी आश्रमातील साधकांनी माझ्या बाबांना (श्री. दत्तात्रय लोहार यांना) ‘रांगोळीचे साचे बनवता येतील का ?’, असे विचारले होते. बाबांनी त्या वेळी ‘हो’ म्हटले; पण त्यांंना अन्य कामांमुळे साचे बनवण्याची सेवा करता येत नव्हती. तेव्हा देवाने माझ्याकडून ती सेवा करून घेतली. ते साचे बनवतांना ‘माझी तळमळ अल्प असूनही गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) माझ्याकडून सेवा करून घेऊन माझा उद्धार करत आहेत’, याची मला जाणीव झाली.
३. योगासने आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकण्यासाठी गुरुकुलात प्रवेश घेणे
३ अ. गुरुकुलाची व्यवस्था सनातनच्या आश्रमाचा आदर्श ठेवून केलेली असणे : मी योगासने आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण हे शिकण्यासाठी ‘सव्यसाची गुरुकुलम्, कोल्हापूर’ या संस्थेच्या वेंगरूळ येथील शाखेत प्रवेश घेतला. त्या वर्गात अध्यात्माविषयी पुष्कळ माहिती सांगत असत. तिथे आलेल्या व्यक्तींकडून भावप्रयोग करून घेतला जात असे. तेथे आरती केली जायची. तेथील निवास आणि भोजन यांची व्यवस्था रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असल्याप्रमाणेच होती. मी तेथील व्यवस्थापकांना विचारले, ‘‘तुम्हाला सनातन संस्थेविषयी काही ठाऊक आहे का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हो ठाऊक आहे. आम्ही सनातन संस्थेत १५ वर्षे प्रचाराची सेवा केली आहे आणि म्हणूनच या गुरुकुलाची व्यवस्था सनातनच्या आश्रमाचा आदर्श ठेवून केली आहे.’’
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा वृद्धींगत होणे : ‘मी आश्रमापासून दूर असले, तरीही देव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मला साधना करण्याची संधी देत आहे आणि ती करून घेत आहे’, याची मला जाणीव झाली. गुरुकुलात आमच्याकडून नियमितपणे नामजप करून घ्यायचे. ‘आपले आचरण कसे असावे ?’, याविषयी ते सनातन संस्थेत सांगितल्याप्रमाणेच सांगायचे. त्या वेळी ‘मी आश्रमात नसले, तरीही परात्पर गुरु डॉ. आठवले माझा हात सोडणार नाहीत’, याची मला पुनःपुन्हा जाणीव होऊन माझ्या त्यांच्याप्रतीच्या श्रद्धेत वृद्धी झाली.
‘गुरुमाऊली, या अज्ञानी जिवाला काही येत नाही आणि माझी तळमळही नाही, तरीही मला साधना अन् सेवा करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. प्रतीक्षा दत्तात्रय लोहार (वय १९ वर्षे), कागल, जिल्हा कोल्हापूर. (८.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |