‘ताण घेणे’, हा साधकाचा दोष दूर होऊन त्याची साधना योग्य रितीने होण्यासाठी सतत प्रयत्नरत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. मनाची स्थिती चांगली नसल्यामुळे ‘साधना किंवा सेवा करू नये’, असे वाटणे
‘एकदा मला प.पू. डॉक्टरांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग मिळाला. माझ्या मनाची स्थिती चांगली नसल्याने मला ‘साधना किंवा सेवा करू नये’, असे वाटत होते. ‘सर्व सोडून कुठेतरी जाऊन शांत बसावे’, असे वाटत होते. हे सर्व मी त्या भेटीत प.पू. गुरुदेवांना सांगितले. मागील १४-१५ वर्षे माझ्याकडे देवद आश्रमातील चिकित्सालयातील वैद्यकीय सेवेचे दायित्व आहे. साधकांच्या अनेक समस्या, विविध प्रकृतीच्या साधकांना सांभाळणे इत्यादी गोष्टी बराच काळ मला एकट्यानेच पहाव्या लागल्याने मला त्या गोष्टींचा ताण येत असे. त्यामुळे मला ‘ही सेवा करू नये’, असे वाटत होते. यावर प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘तुम्ही ताण घेऊ नका, तर ताण हाताळायला शिका.’’
२. ‘एकदा आतील आनंदाची अनुभूती आली की, तुझे बाबा कुठेही आनंदात राहू शकतील’, असे प.पू. गुरुदेवांनी साधकाच्या मुलीला सांगणे
प.पू. गुरुदेवांबरोबर झालेल्या एका भेटीत माझी मुलगी प.पू. गुरुदेवांना म्हणाली, ‘‘आता आमचे गोव्यात घर झाले आहे. आता आई-बाबांना गोव्यातच राहू दे का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुझ्या बाबांना आतील आनंदाची अनुभूती आली की, ते कुठेही असले, तरी आनंदात रहातील. त्यामुळे मग ‘देवद आश्रमात रहायचे कि रामनाथी आश्रमात रहायचे ?’, हा प्रश्नच उरणार नाही. यासाठी मी प्रयत्नरत आहे.’’
३. संतांनी केलेले साहाय्य
३ अ. ‘तुम्ही तुमच्या सर्व समस्या पुढे मांडत जा’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगणे आणि ‘ताण घेणे’, या स्वभावदोषामुळे स्वतःच्या चेहर्यावर कधी आनंद दिसत नाही’, ही गोष्ट लक्षात येणे : यापूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही मला सांगितले होते, ‘‘आश्रम म्हणजे प्रत्यक्ष श्रीविष्णुस्वरूप श्री गुरूंचा विष्णुलोक आहे. येथे ‘कोणतीही समस्या सुटली नाही’, असे होत नाही. तुम्ही तुमच्या सर्व समस्या पुढे मांडत जा.’’ तेव्हा ‘ताण घेणे’, हा माझा स्वभावदोष असून तो जाण्यासाठी मला प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी संतांचा संकल्पही झाला आहे’, हे माझ्या लक्षात आले. ताण घेण्यामुळेच माझ्या चेहर्यावर कधी आनंद दिसत नसे. ‘माझा चेहरा सदैव त्रस्त दिसतो आणि माझ्या वागण्या-बोलण्यातून ती त्रस्तता व्यक्त होतेे’, हे माझ्या लक्षात आले. ताणामुळेच मन अस्थिर होऊन मी स्वतः कधी आनंद आणि शांती अनुभवू शकत नव्हतो अन् साधकांनाही कधी आनंद देऊ शकत नव्हतो.
३ आ. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी प्रत्येक कृती विचारून करण्याची सवय लावणे : काही वर्षांपूर्वी पू. अश्विनीताई (पू. (सौ.) अश्विनी पवार) यांच्या समवेत मला प.पू. गुरुदेवांचा सत्संग लाभला होता. तेव्हा मी प.पू. गुरुदेवांना म्हणालो होतो, ‘‘माझ्यात जे काही पालट झाले आहेत, ते पू. अश्विनीताईंच्या प्रयत्नांमुळेच झाले आहेत. त्यांनी मला प्रत्येक कृती विचारून करण्याची सवय लावली.’’ तेव्हा प.पू. गुरुदेव मला म्हणाले होते, ‘‘तुमची विचारप्रक्रिया पू. अश्विनीताईंप्रमाणे व्हावी, यासाठी प्रयत्न करा.’’
३ आ १. स्वतःमधील अहंमुळे प.पू. गुरुदेवांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करणे : माझ्यातील अहंमुळे पूर्वी मला ‘मी आधुनिक वैद्य आहे. मला वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान आणि इतक्या वर्षांचा अनुभव आहे. त्यात पू. अश्विनीताईंना काय विचारायचे ? उलट त्यांनीच मला समजून घ्यावे’, असे वाटत असल्यामुळे मी प.पू. गुरुदेवांच्या या आज्ञेकडे दुर्लक्ष केले होते. सुमारे ४ वर्षांनंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली. ४ वर्षांपूर्वीच गुरुदेवांनी माझ्यामध्ये या गोष्टीचे बीज पेरून ठेवले होते. ‘आज नाही, तर कधीतरी माझ्या ते ध्यानात येईल’, यासाठी ते संयम ठेवून अविरतपणे प्रयत्न करत होते. अशा श्री गुरूंची महानता शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
३ इ. देवद आश्रमात परत आल्यानंतर सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी परिस्थिती स्वीकारण्यास सांगणे, समस्या पुढे मांडण्यास शिकवणे आणि त्यामुळे ताण न्यून होऊ लागणे : एकदा चिकित्सालयातील सहसाधक काही कारणाने अनुपस्थित असल्यामुळे मला ताण आला. मी आढावा सत्संगात तसे सद़्गुरु राजेंद्रदादांना (सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांना) सांगितले. त्यांनी मला ‘ही परिस्थिती स्वीकारा’, असे सांगितले. तेव्हा ‘देवानेच माझे स्वभावदोष घालवण्यासाठी ही परिस्थिती निर्माण केली आहे’, हे माझ्या लक्षात आले आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न चालू केले. मी पू. अश्विनीताईंना माझ्या समस्या सांगू लागलो, त्यामुळे माझ्या मनावरील ताण हलका होत गेला. मला पू. अश्विनीताईंकडून ‘समस्या कशा सोडवायच्या ?’, हे शिकायला मिळाले.
४. प.पू. गुरुदेवांची सर्वज्ञता दर्शवणारे पूर्वीचे काही प्रसंग
या प्रसंगावरून मला ‘ताण घेणे’ या स्वभावदोषाच्या अनुषंगाने प.पू. गुरुदेवांनी मला पूर्वीही अवगत करून ठेवले होते’, या संदर्भातील काही जुने प्रसंग आठवले. यावरून त्यांची सर्वज्ञता आणि त्रिकालज्ञानी अवस्था माझ्या लक्षात आली.
४ अ. एका जाहीर प्रवचनाच्या वेळी ‘तुमच्याकडे या वेळी नियोजनाची सेवा नसल्यामुळे तुम्हाला ताण आला नाही आणि त्यामुळे तुम्हाला सभेचा आनंद घेता आला’, असे प.पू. गुरुदेवांनी सांगणे : वर्ष १९९७ मध्ये मला प.पू. गुरुदेवांच्या पुणे जिल्ह्यातील एका जाहीर प्रवचनाच्या नियोजनाचे दायित्व मिळाले होते. ते प्रवचन झाल्यानंतर जिल्ह्यातील अन्य ठिकाणी दुसरे प्रवचन होते. त्या प्रवचनाला समाजातील लोकांची पुष्कळ उपस्थिती होती. त्याचे नियोजन अन्य साधकाकडे होते. ते प्रवचन झाल्यावर मी प.पू. गुरुदेवांना म्हणालो, ‘‘आजचा कार्यक्रम पुष्कळच छान झाला. आनंद मिळाला.’’ तेव्हा प.पू. गुरुदेव मला म्हणाले होते, ‘‘हो. आज तुम्हाला कसला ताण नव्हता ना; म्हणून तुम्हाला आनंद मिळाला.’’ त्या वेळीच त्यांनी खरेतर मला ‘माझ्यातील ‘ताण घेणे’ या स्वभावदोषाविषयी अवगत केले होते’, हे आता माझ्या ध्यानात येते.
४ आ. ‘ताण घेणे’, या स्वभावदोषामुळे पुष्कळ सेवा करूनही आनंद मिळत नसल्याचे प.पू. गुरुदेवांनी लक्षात आणून देणे : त्या कालावधीत मी पुष्कळ झोकून देऊन सेवा करत होतो. प.पू. गुरुदेव एका साधकाला म्हणाले, ‘‘डॉ. कुलकर्णी एवढी सेवा करतात; परंतु त्यांच्या चेहर्यावर आनंद का दिसत नाही ?’’ प.पू. डॉक्टरांनी माझे व्यक्तीमत्त्व (गुण आणि स्वभावदोष) ओळखून योग्य दृष्टीकोनाचे बीज माझ्या अंतर्मनात रोवले. त्यांनी माझ्या ‘ताण घेणे’ याच स्वभावदोषावर अनेक संतांच्या माध्यमातून मला मार्गदर्शन केले.
४ इ. प.पू. गुरुदेवांनी ‘साधकांच्या समस्या सोडवणे’ ही श्रेष्ठ प्रतीची साधना आहे’, असे सांगणे : वर्ष १९९९ मध्ये एकदा मी प.पू. गुरुदेवांसमवेत प्रवास करत होतो. तेव्हा त्यांनी मला काही जिल्ह्यांतील समस्यांविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘‘साधकांच्या समस्या सोडवणे’, ही श्रेष्ठ साधना आहे.’’ तेव्हा अंतर्मुख होऊन माझेही चिंतन झाले.
४ ई. प.पू. गुरुदेवांनी ‘साधकाची प्रगती कोणत्या सेवेच्या माध्यमातून होणार आहे ?’, हे ओळखून योग्य ती सेवा देणे
४ ई १. पुनःपुन्हा देवद आश्रमात वैद्यकीय सेवेसाठी पाठवणे : वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त मी मराठी ग्रंथ, धर्मसत्संग आणि हिंदी पाक्षिकासाठी हिंदी भाषेत भाषांतर करणे इत्यादी सेवा करत असे. त्या निमित्ताने मला नेहमीसाठी रामनाथी आश्रमात रहायला येण्याची अनुमती मिळाली होती. असे असतांनाही काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होत असे की, मला पुन्हा परत देवद आश्रमातील चिकित्सालयात सेवेला यावे लागत असे. तेव्हा ‘मी साधना करण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय सोडला, तरी प.पू. गुरुदेव मला पुनःपुन्हा वैद्यकीय सेवेसाठीच का पाठवतात ?’, असा प्रश्न माझ्या मनात येत असे. ते प्रत्येक वेळी मला म्हणत, ‘डॉक्टर, देवदला जा. तिथे तुमचे रुग्ण तुमची वाट पहात आहेत.’ मी देवदला पोचल्यावर प.पू. गुरुदेव तेथील संतांना म्हणायचे, ‘‘डॉ. कुलकर्णी देवदला पोचले का ? चला, आता माझी काळजी मिटली.’’
४ ई २. साधकामधील अहंभावामुळे त्याला प.पू. गुरुदेवांच्या बोलण्यामागील कारण न कळणे, तेव्हा सद़्गुरु राजेंद्रदादांनी ‘वैद्यकीय सेवेतूनच तुमची साधना होणार आहे’, असा त्याचा भावार्थ सांगणे : ‘माझ्यात कौशल्य आहे. मी चांगला आधुनिक वैद्य आहे; म्हणून प.पू. गुरुदेव मला पुनःपुन्हा वैद्यकीय सेवा करण्यासाठी देवद येथे जायला सांगतात’, असा अहंयुक्त विचारही माझ्या मनात येत असे. एकदा सद़्गुरु राजेंद्रदादांच्या व्यष्टी आढाव्यात मी हे सूत्र त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला त्याचे कारण समजावून सांगितले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही चांगले वैद्य आहात, यापेक्षा ‘वैद्यकीय सेवेतूनच तुमची साधना होणार आहे’, हे गुरुदेवांना ठाऊक आहे; म्हणून तुम्ही देवदला आल्यावर ते ‘माझी काळजी मिटली’, असे म्हणतात. प.पू. गुरुदेवांना ‘चांगले वैद्य’ नव्हे, तर ‘चांगला साधक’ हवा आहे.’’ सद़्गुरु राजेंद्रदादांनी मला हा भावार्थ समजावून सांगितल्यामुळे मला ही सेवा मनापासून स्वीकारता आली आणि तसे माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले.
५. संतांना जाणवलेले साधकातील पालट
५ अ. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘इतरांना तुमच्या चेहर्यावर आनंद जाणवत आहे’, असे सांगणे : हळूहळू माझ्या मनावरील ताण अल्प होत गेल्याने माझ्या वागणा-बोलण्यात पालट होऊ लागला. मला आनंदी रहायला जमू लागले. हे काही साधकांनाही जाणवले. सद़्गुरु राजेंद्रदादांनी मला ‘साधकांना तुमच्या चेहर्यावर आनंद जाणवतो. त्यांना तुमचा आधार वाटून तुमच्याकडे यावेसे वाटते’, असे सांगितले.
५ आ. पू. अश्विनी पवार यांनी ‘तुमची आता ऐकण्याची स्थिती आली आहे’, असे सांगणे : पू. अश्विनीताईही मला म्हणाल्या, ‘‘तुमच्यात आता पालट होऊ लागला आहे. पूर्वी तुम्हाला तुमचेच म्हणणे योग्य वाटत असे. आता तुमची ऐकण्याची स्थिती आली आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू शकतो.’’ मला पू. अश्विनीताईंकडून समष्टी साधनेचे धडे मिळू लागले. ‘देव आता खर्या अर्थाने माझी समष्टी साधना करून घेत आहे’, याविषयी मला कृतज्ञता वाटते.
५ इ. संतांच्या साहाय्याने प्रसंग आणि समस्या सोडवता आल्याने ताण न येणे : पूर्वी मला चिकित्सालयातील वैद्यकीय सेवेचा ताण येत असे. आता मला त्या सेवेचा ताण येत नाही. आनंद मिळतो. मला संतांच्या साहाय्याने प्रसंग आणि समस्या सोडवता येतात. त्यामुळे आता मला स्वतःमध्येही पालट जाणवत आहे. ही सर्व गुरुदेवांची कृपा आहे.
६. प.पू. गुरुदेवांचे जाणवलेले महानत्व !
६ अ. प.पू. गुरुदेवांचे प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्यच असणे : प.पू. गुरुदेवांचे प्रत्येक वाक्य हे ब्रह्मवाक्य असते. त्यानुसार पुढे घडणारच असते. तो त्यांचा संकल्प असतो. प.पू. गुरुदेवांंना साधकांच्या साधनेतील अडचणी सोडवण्याची पुष्कळ तळमळ आहे. ते साधकांना मार्गदर्शन करतात, त्या वेळी आवरण किंवा अल्पबुद्धी यांमुळे आम्हाला त्याचे आकलन होत नाही; मात्र त्यानुसार प्रयत्न केल्यावर काही कालावधीनंतर त्या वाक्यांची प्रचीती येऊन त्यांचा भावार्थ कळतो.
६ आ. प.पू. गुरुदेवांनी साधकामधील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यास साहाय्य करून त्याची साधनेची हानी टाळणे : प.पू. गुरुदेवांनी माझ्या ‘ताण घेणे’ या स्वभावदोषामुळे उद़्भवणारे दडपण, निराशा, नकारात्मकता, भीती आणि त्याचे समष्टीवर होणारे परिणाम यांमुळे माझी साधनेत होणारी हानी टाळली.
६ इ. परिस्थिती घडवून शिकवणे : देवाने (प.पू. गुरुदेवांनी) परिस्थिती घडवून मला ‘ऐकणे, स्वीकारणे आणि शिकणे’ या स्थितीत आणले. ‘शिष्याला पुष्कळ सेवा देऊन आणि विविध प्रसंगांच्या माध्यमातून श्री गुरु कसे घडवतात ?’, याची मला प्रचीती आली.
७. श्री गुरूंचे शिष्याच्या जीवनातील महत्त्व !
७ अ. श्री गुरु अनंतकाळ शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करत असतात. ‘उत्तरदायी साधकांच्या माध्यमातूनही हे गुरुतत्त्व कार्य करते’, हे माझ्या लक्षात आले.
७ आ. ‘शिष्याच्या जीवनातील अंधकार दूर करून त्याला आनंदाची अनुभूती देतात, ते ‘गुरु !’, या सुवचनाची मी अनुभूती घेतली.
७ इ. श्री गुरूंनी एकदा शिष्याचे बोट धरल्यावर ‘शिष्याला आतून आनंद मिळेपर्यंत ते अथक प्रयत्नरत असतात’, याची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याने माझ्या त्यांच्यावरील श्रद्धेला बळकटी आली.
७ ई. ‘श्री गुरूंच्या प्रत्येक वाक्यात काय दडले आहे ?’, हे सामान्य बुद्धीला (व्यावहारिक दृष्ट्या कितीही उच्च बुद्धी वा शिक्षण असले, तरी) समजू शकत नाही. त्यामुळे ‘मनात कसलीही शंका न आणता त्यांच्या आज्ञापालनातच साधकाचे कल्याण असते’, हे माझ्या लक्षात आले.
८. कृतज्ञता
प.पू. गुरुदेवांंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरेच आहेत. त्यांनी मला ‘ही कृतज्ञता अनुभवण्यास दिली’, हेच माझे परमभाग्य आहे. आता मला तणावविरहित सेवा करता येऊ लागली आहे. मला आनंद आणि शांती अनुभवता येऊ लागली आहे. मला स्थिर रहाता येऊ लागले आहे. प्रसंगाला सामोरे जाणे किंवा समस्या सोडवणे इत्यादी अल्प प्रमाणात का होईना, जमू लागले आहे. यासाठी मी प.पू. गुरुदेव, सद़्गुरु राजेंद्रदादा आणि पू. अश्विनीताई यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
९. प्रार्थना
असे महान गुरुदेव आणि सनातनचे संत यांची महती शब्दांत व्यक्त करणे फार कठीण आहे. ते कृपा आणि संकल्प करणारच आहेत. ‘न मागताही ते देतच रहाणार आहेत’, याची मला शाश्वती आहे आणि तशी माझी श्रद्धाही आहे. ‘जन्मोजन्मी त्यांनी मला त्यांच्या चरणांशी ठेवावे’, हीच त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना !’
– आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |