हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
१६ ते २२ जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !
पुणे, ९ जून (वार्ता.) – गोवा येथे गेल्या १० वर्षांपासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ होत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदा १६ ते २२ जून २०२३ या कालावधीमध्ये फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन केले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. येथील गांजवे चौकातील श्रमिक पत्रकार भवन येथे अधिवेशन संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
डावीकडून अधिवक्त्या सीमा साळुंखे, डॉ. नीलेश लोणकर, श्री. शंभू गवारे, प्रा. श्री. विठ्ठल जाधव, कु. क्रांती पेटकर, श्री. पराग गोखले
या पत्रकार परिषदेला श्री. शंभू गवारे यांच्यासह सनातन संस्थेचे प्रा. श्री. विठ्ठल जाधव, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगावचे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर, अधिवक्त्या सीमा साळुंखे, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. पराग गोखले उपस्थित होते.
१. हिंदूंंवर होणारी आक्रमणे, त्यांना भेडसावणार्या समस्या, त्यांच्यावर येणारी संकटे या संदर्भात समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.
२. वैश्विक स्तरावर हिंदूंचे स्वतःचे राष्ट्र व्हावे यासाठीच अधिवेशनाचे आयोजन केले आहे.
३. हिंदू समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न तसेच भारताला सक्षम हिंदु राष्ट्र बनवणे असा या अधिवेशनाचा उद्देश असून अधिवेशनाच्या माध्यमातूनच हिंदु राष्ट्र निर्मितीला गती मिळणार आहे.
४. विश्व कल्याणासाठी भारत हिंदु राष्ट्र घोषित होणे आवश्यक आहे. पीडितांना न्याय मिळावा यासाठी कृतीच्या स्तरावर सामोरे जायला हवे. समाजाला योग्य मार्गावर घेऊन जाण्यासाठी हे अधिवेशन निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास श्री. गवारे यांनी व्यक्त केला.
५. या अधिवेशनामध्ये अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर, बेल्जियम, बांगलादेश, नेपाळ या देशांसह भारतातील २८ राज्यातील ३५० हून अधिक हिंदू संघटनांच्या १ सहस्त्र ५०० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केले.
६. समाजावर होत असलेली आक्रमणे तसेच त्यांच्यावर येणारी संकटे यांसंदर्भात जागृती करणे, त्यावरील उपाययोजना निश्चित करणे आणि सामूहिक कार्यक्रम ठरवणे या सूत्रांवर हे अधिवेशन आधारित आहे, असेही त्यांनी सांगितले.
या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसद’ हा नवीन भाग असणार आहे. त्याचसमवेत गडकोटांवर होणारे इस्लामिक आक्रमण, मंदिर संस्कृतीचे जतन, हिंदूंवर होणारे अत्याचार या संदर्भातील चर्चासत्र होणार आहे. हे अधिवेशन म्हणजे हिंदुराष्ट्र उभारण्याची एक प्रकारची पायाभरणीच आहे असे सनातन संस्थेचे प्रा. श्री. विठ्ठल जाधव यांनी सांगितले.
हिंदूंंना कृतीशील होण्याचा विचार या अधिवेशनाच्या माध्यमातून मिळतो, तसेच कार्य करण्याची एक दिशा प्राप्त होते, असे केडगाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचचे अध्यक्ष श्री. लोणकर यांनी सांगितले.
हिंदु धर्माचे महत्त्व, त्यातील आचार-विचार, तसेच हिंदु धर्माचा प्रचार होण्यासाठी हिंदु राष्ट्र घोषित होणे आवश्यक आहे. जग विनाशाकडे चालले आहे, अध्यात्माच्या ताकदीने त्याला जागृत अवस्था प्राप्त करून द्यायची आहे, असे मत अधिवक्त्या सीमा साळुंखे यांनी व्यक्त केले.
विशेष
पत्रकार परिषदेची वेळ संपून गेल्यावरही उपस्थित पत्रकारांनी आस्थेने प्रश्न विचारले. अधिवेशनाच्या संदर्भात शंकांचे निरसन करून घेऊन अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या.