भारतासह अन्य देशांवर दादागिरी करणार्या चीनला टक्कर देण्यासाठी भारताची सिद्धता !
भारतात ‘मेरीटोक्रसी’ (कौशल्याला प्राधान्य) वाढायला हवी !
आज जागतिक संस्थांमध्ये भारतीय बुद्धीमत्ता मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. भारतातील बुद्धीमान मुले ‘आय्.आय्.टी.’सारख्या संस्थांमध्ये शिकून परदेशात जातात आणि यशस्वी होतात. भारताची बुद्धीमत्ता भारतातच रहायला हवी. जगातील संस्था आज भारतात गुंतवणूक करत आहेत. जगातील सर्वाधिक भ्रमणभाष सिद्ध करणारे कारखाने भारतात आहेत. काही वर्षांनी सौर ऊर्जा निर्मितीचे कारखानेसुद्धा भारतात उभे रहातील. यातून भारतीय अर्थव्यवस्था वाढीस लागून चीनला टक्कर देण्यासाठी आपण सिद्ध होऊ. चिनी अर्थव्यवस्था सध्या भारतापेक्षा अधिक असली, तरी चीनमध्ये मंदी आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याने येत्या काळात भारत चीनच्या अर्थव्यवस्थेशी बरोबरी करील, यात शंका नाही. – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
१. चीनचा वेळोवेळी दिसणारा भारतद्वेष !
१ अ. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व न मिळण्यासाठी चीन प्रयत्नशील ! : ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’त (‘युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल’मध्ये) या जगातील सर्वांत मोठ्या संस्थेचे ५ स्थायी सदस्य देश आहेत. अन्य देश हे तात्पुरते सदस्य आहेत. चीन हा कायमचे सदस्यत्व असलेला देश असून त्याच्याकडे ‘व्हेटो’ची (नकाराधिकाराची) उपलब्धता आहे. या संस्थेच्या कामाचे विश्लेषण केल्यास असे दिसते की, या संस्थेच्या कामांचा ८० टक्के वेळ हा काही प्रमुख देशांचे हित जपण्यासाठी वापरला जातो. त्या देशांच्या विरोधात कुणी गेल्यास त्यांच्या विरोधात ‘व्हेटो’ वापरला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत येणार्या संस्थांचा वापर करून चीन भारताला सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व न मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे.
१ आ. ‘न्यूक्लियर सप्लाय ग्रुप’ (आण्विक पुरवठा गट) या संस्थेतही चीन भारताला येऊ देत नाही; कारण आपण याचे सदस्य झाल्यास भारताचा ‘न्यूक्लियर पॉवर प्रोग्राम’ (अणूऊर्जा कार्यक्रम) मोठ्या प्रमाणात वाढीस लागेल.
१ इ. संयुक्त राष्ट्रांमध्ये चीनने अनेक वेळा भारताच्या विरोधात मतदान केले आहे.
१ ई. ‘लष्कर ए तोयबा’मधील हाफिझ सईद याला जागतिक आतंकवादी घोषित करण्यासाठी भारताने मागणी केली असतांना चीनने त्याच्या विरोधात ‘व्हेटो’ वापरला होता.
१ उ. चीन संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत असलेल्या संस्थांचा वापर करून भारताविरोधात काहीतरी चुकीची माहिती पसरवत असतो.
१ ऊ. ‘ह्यूमन राईट्स कमिशन’ (आंतरराष्ट्रीय) मानवाधिकार समिती) ही संस्था अनेक वेळा भारताविरोधात बोलत असते; परंतु चीनमध्ये २० लाखांहून अधिक उघुर मुसलमान बंदिवासात असूनही त्याविरोधात काहीच बोलत नाही.
२. जागतिक आरोग्य संघटनेचे (‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनयझेशन’चे) जीवघेणे चीनप्रेम !
‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनयझेशन’ने ‘कोविड १९’ या विषाणूचा चीनमध्ये झालेला संसर्ग लपवण्याचा प्रयत्न केला. या विषाणूच्या माध्यमातून चीनने चालवलेले हे जैविक महायुद्ध आहे. २ महायुद्धांत झालेल्या हानीपेक्षा या विषाणूमुळे झालेली जागतिक हानी अधिक आहे.
३. चीनची केली जाणारी पाठराखण
संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत असलेल्या अनेक संस्थांना बराचसा पैसा चीन पुरवतोे. यामुळे चीनला वाचवण्याचा प्रयत्न या संस्थांकडून केला जातो. पाकिस्तानला आतंकवाद वाढण्यासाठी चीनचे साहाय्य असले, तरी याविरोधात कुणी विशेष बोलत नाही.
४. भारताची आक्रमक मुत्सद्देगिरी !
४ अ. ‘जी-२०’चे (विकसित अन् विकसनशील देशाचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना) अध्यक्ष आणि पंतप्रधानांचे विदेश दौरे यांमुळे भारताला झालेला लाभ : संयुक्त राष्ट्रांतील चीनचे वर्चस्व अल्प करून राष्ट्रहित जपण्यासाठी भारताने आक्रमक मुत्सद्देगिरी वापरली आहे. आपण ‘जी-२०’चे अध्यक्ष आहोत. या काळात ‘ग्लोबल साऊथ कंट्री’ (गरीब देश ज्यांची प्रगती झाली नाही) यांच्याविषयी आपण आवाज उठवत आहोत. त्यात यश मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांनी १४ पॅसिफिक देशांचा दौरा केला. त्या देशांच्या राष्ट्र्रपतींनी मोदी यांना ‘ग्लोबल साऊथ कंट्री’चे मोठे नेते अशा स्वरूपात स्वीकारले. कोणत्याही प्रस्तावाच्या बाजूने किंवा विरोधात मतदान करतांना हे देश आता भारताच्या बाजूने मतदान करतील.
४ आ. चीनची पॅसिफिक देशांमध्ये घुसखोरी; पण भारताकडून साहाय्य ! : चीन पॅसिफिक देशांमध्ये घुसून त्यांच्या राजकीय वातावरणात घुसखोरी करत आहे, तसेच त्यांची राष्ट्रीय आणि नैसर्गिक संपत्ती लुबाडण्याचा प्रयत्न करत आहे. भारत या देशांना त्यांच्या प्रगतीसाठी साहाय्य करत आहे. भारताने या देशांचे केलेले संघटन हे एक मोठे संघटन होणार आहे.
५. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक संस्थांमध्ये उपस्थिती वाढवणे आवश्यक !
संयुक्त राष्ट्रांच्या अनेक आर्थिक संस्था जसे की, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड ट्रेड यांच्यामध्ये आपली उपस्थिती वाढायला हवी. भारतीय अर्थव्यवस्था वाढल्यास या संस्थांमध्ये आपली टक्केवारी वाढून त्व्यातून जागतिक स्वरूपातील निर्णयांत भारताच्या मताला अधिक महत्त्व मिळू शकते.
६. भारतद्वेष जर्मनीच्या अंगाशी आला !
चीन भारताविरोधात जागतिक माध्यमांचा वापर करून भारताविषयी चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतो. ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ही वर्तमानपत्रे याची उदाहरणे आहेत. ज्या वेळी भारताने अवकाशात जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जर्मनीमधील एका वृत्तपत्रात भारताविरोधी टीकात्मक आणि उपहासात्मक चित्र प्रसिद्ध झाले. त्यात चीनशी तुलना केली होती. वास्तव म्हणजे त्याच जर्मनीची अर्थव्यवस्थेत मंदी आलेली आहे.
७. ग्रेट ब्रिटनला भारतीय बुद्धीमत्तेची आवश्यकता भासणे हे विशेष !
भारताची अर्थव्यवस्था जगातील देशांच्या तुलनेत अतिशय वेगाने वाढत आहे. आज ७५ वर्षांत भारताची प्रगती झाली आहे. ग्रेट ब्रिटनसारख्या देशाला भारतीय बुद्धीमत्तेची आवश्यकता भासते, हे अतिशय समर्पक उदाहरण आहे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.