सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !
सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव ११ मे २०२३ या दिवशी साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काष्ठापासून बनवलेल्या सुवर्ण रंगाच्या दिव्य रथात विराजमान झाले होते. ‘या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि साधकांना सेवा करतांना आलेल्या अडचणी, त्या अडचणींवर गुरुकृपेने केलेली मात अन् त्यांना आलेल्या बुद्धीअगम्य अनुभूती’ पुढे दिल्या आहेत. ९ जून या दिवशी आपण रथनिर्मितीच्या कार्यातील रथावरील नक्षी आणि रथाचा रंग हे भाग पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ५)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/690376.html
९. प्रत्यक्ष रथ बनवणे
९ अ. रथ बनवतांना प.पू. गुरुदेवांनी लाकडाची स्पंदने लक्षात घ्यायला सांगणे : ‘आम्ही गुरुदेवांना विचारले, ‘‘रथासाठी लाकूड कसे वापरायचे ?’’ तेव्हा गुरुदेवांनी सांगितले, ‘‘वृक्षाचे मूळ खाली आणि शेंडा वर असतो. चांगली स्पंदने प्रक्षेपित होण्यासाठी उभ्या खांबांसाठी लाकडाच्या मुळाच्या नसा खाली आणि शेंड्याच्या नसा वर असायला हव्यात आणि आडव्या फळीसाठी लाकडाच्या मुळाच्या नसा पुढे अन् शेंड्याच्या नसा मागे असायला हव्यात.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केले.
१०. रथावरील नक्षीचे लाकडावर कोरीव काम करणे
१० अ. श्री. अजय पांचाल यांना ‘सी.एन्.सी.’ वापरून नक्षी बनवण्यासाठी विचारल्यावर त्यांनी लगेच होकार देणे आणि अल्प दरात अपेक्षित नक्षी बनवून देणे : ‘सी.एन्.सी.’ म्हणजे सिद्ध संगणकीय आज्ञांवर स्वयंचलित चालणारी यंत्रे ! संगणकात नक्षी तयार केल्यावर या यंत्राला ‘टूल्स’ लावल्यावर यंत्र त्या लाकडावर नक्षी तयार करते. आम्ही हे यंत्र कधीही पाहिले नव्हते आणि त्याचा वापरही केला नव्हता. आम्हाला याचा अनुभव नसल्यामुळे आम्ही अशी नक्षी बनवू शकणार्या व्यक्तींचा गोवा येथे सर्वत्र शोध घेतला. त्या वेळी संगणकावर नक्षी बनवणे कुणालाही जमत नसल्याचे लक्षात आले.
श्री. अजय पांचाल ‘सी.एन्.सी.’ (Computerized Numerical Control) वापरून रथावर नक्षी काढणारे आहेत. मी प्रथमच त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी लगेच सांगितले, ‘‘मी हे करून देऊ शकतो. काही अडचण नाही.’’
(सुतारकाम करणारे श्री. अजय पांचाल यांचे काम सुंदर आहे. त्यांनी नक्षी परिपूर्ण बनवून दिल्या आहेत.) त्यांच्या मोठ्या भावाने (श्री. मनोहर पांचाल यांनी) लगेच येऊन माप घेतले. त्यांचाही देवाप्रती भाव चांगला आहे. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला जसे अपेक्षित आहे, तसे आम्ही करून देऊ.’’ श्री. पांचाल यांनी अत्यंत अल्प दरात अपेक्षित अशी सेवा करून दिली.’
११. श्री. दत्तात्रेय लोहार यांची रथ बनवण्याच्या सेवेसाठी विविध यंत्रे आणि अवजारे बनवण्याची कल्पकता !
११ अ. लोखंडाच्या लहान तुकड्यांपासून लाकडाला गोल आकार देण्यासाठीचे Lathe यंत्र बनवणे
११ अ १. श्री. दत्तात्रेय लोहार यांनी बनवलेल्या यंत्रामुळे रथासाठीचे खांब बनवण्याचा व्यय अल्प होणे : ‘दत्तादादांनी (श्री. दत्तात्रेय लोहार यांनी) उपयुक्त Lathe यंत्र (लाकडाला गोल आकार देण्यासाठी वापरायचे यंत्र) बनवले. दादांनी रथाचे खांब गोलाकार करण्यासाठी लागणारे १२ फुटांचे लोखंडाचेे मोठे यंत्र बनवले आहे. १२ फूट उंचीचे यंत्र गोवा आणि बेळगाव येथेही नाही. ‘सी.एन्.सी’मध्ये एक आहेे; पण त्याची किंमत पुष्कळ आहे. एक खांब बनवायला ६ सहस्र रुपये व्यय आला असता. दत्तादादांनी सांगितले, ‘‘हे यंत्र आपण बनवले, तर चांगले होईल.’’ मग आम्ही आपल्याला हवे तितके मोठे यंत्र बनवण्याचे ठरवले. आपल्याकडे लोखंडाचे लहान तुकडे होते. त्यांचा उपयोग करून २ दिवसांत दादांनी ते यंत्र बनवले.’ – श्री. प्रकाश सुतार
११ अ २. या यंत्रामुळे ‘रथाचे खांब, घुमट आणि चाके बनवणे’, या सेवा झाल्या. यंत्रामुळे ती सेवा लवकर झाली.
११ आ. रथातील ‘ब्रेक’ची व्यवस्था चांगली असल्याने रथ कुठेही थांबवू शकत असणे : गोव्यात डोंगराळ भाग असल्याने चढ-उतार आहे. आम्हाला वाटत होते, ‘उतार असतांना रथ थांबवायचा आणि वळवायचा कसा ?’ उतार असल्यामुळे ‘ब्रेक’ तर हवेत; कारण रथाचे इतके वजन नियंत्रणात ठेवणे अशक्य आहे. दत्तादादांना जसे सुचले, तसे ते करत गेले. त्यांनाही समजले नाही, ‘ते हे सर्व कसे करत आहेत अन् हे कसे झाले ?’ पाठीमागच्या चाकांसाठी ‘ब्रेक’ची व्यवस्था पुष्कळ चांगली झाली. जसे अपेक्षित होते, तसे झाले. रथ कुठेही थांबवू शकतो. ही व्यवस्था करण्यासाठीही आम्हाला पू. कवटेकरगुरुजींचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
११ इ. लोखंडी तुकड्यांपासून लाकूड आवळण्यासाठी वापरण्याचे यंत्र २ वर्षांपूर्वीच बनवणे आणि त्याचा आता रथसेवेत उपयोग होणे : दत्तादादांनी उपलब्ध असलेल्या लोखंडी तुकड्यांपासून लाकूड आवळण्यासाठी वापरण्याचे ११ फुटांचे अवजार २ वर्षांपूर्वी बनवले होते. त्याचा उपयोग आता रथ बनवण्याच्या सेवेत झाला. ‘दादांनी २ वर्षांपूर्वीच हे अवजार बनवणे’, हे ईश्वराचेच नियोजन होते’, हे आमच्या लक्षात आले.
११ ई. ‘रथाची लाकडी चाके झिजू नयेत’, यासाठी लोखंडी धावपट्ट्या बनवणे : रथाची चाके लाकडी असल्याने रथ चालल्यावर ती झिजतात. ‘रथाची चाके झिजू नयेत’, यासाठी रथाच्या चाकांच्या आकारानुसार श्री. दत्ता लोहार यांनी लोखंडी धावपट्ट्या बनवल्या. त्यांनी त्या विस्तवावर २ घंटे गरम केल्या आणि लाकडी चाकांवर बसवल्या. गरम धावपट्ट्यांवर पाणी ओतल्यावर रथाच्या चाकांवर त्या अगदी मापात बसल्या.’ – श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
११ उ. रथातील प्रकाशयोजनेसाठी रथाच्या खाली ‘बॅटरी’ ठेवण्यासाठी जागा तयार करणे : ‘रथाच्या प्रकाशयोजनेसाठी त्याच्या खाली ‘बॅटरी’ ठेवण्यासाठी जागा तयार केली आहे. त्यासाठी रथाच्या खाली जाऊन तेथे एक फळी लावली. ती जागा पाहून आत नट-बोल्ट बसवले आणि केवळ अर्ध्या घंट्यात २ ‘बॅटरीज्’ आणि १ ‘यू.पी.एस्.’ बसवण्याची सेवा देवाच्या कृपेने पूर्ण झाली. या बॅटरीवर रथावरील दिवे ५ – ६ घंटे चालू राहू शकतात. आम्ही आधी कधीच असे यंत्र बनवले नव्हते. त्यासाठीही मी गुरुदेवांनाच प्रार्थना केली होती. ‘रथाला लागणारे जे यंत्र आहे, ते चांगल्या प्रकारे व्हायला हवे. त्यात कोणत्याच प्रकारचा बिघाड व्हायला नको.’ आणि तेही यंत्र बनवता आले. त्याची गतीही पुष्कळ चांगली आहे. ‘बॅटरी’ भारित (चार्जिंग) करण्यासाठी काढू शकतो.
११ ऊ. रथ वळवण्याची व्यवस्था करणे : रथाच्या पुढच्या दोन चाकांच्या मध्यभागी एकच पाईप घेतला की, दोन्ही चाके एकाच बाजूला वळू शकतील, अशा प्रकारची रचना केली. त्यामुळे एकच व्यक्ती रथ वळवू शकते.’
(क्रमश:)
– श्री. दत्तात्रेय लोहार, खडकेवाडी, कागल, जिल्हा कोल्हापूर.
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/691033.html