माऊलींच्या रथाचे अश्व ‘हिरा-मोती’चे पुण्यात स्वागत !
पुणे – कर्नाटकातील अंकलीहून शितोळे सरकारांच्या वाड्यातून ३१ मे या दिवशी प्रस्थान झालेल्या माऊलींच्या दोन्ही अश्वांचे ८ जून या दिवशी पुण्यात आगमन झाले आहे. हिरा आणि मोती या अश्वद्वयींचा हा यंदाचा पायी प्रवास तसा खडतर होता. विसाव्याच्या ठिकाणी आणि मुक्कामीही त्यांची काळजी घेतली गेली आहे. भर उन्हात प्रवास न करता शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी प्रवास करत हे अश्व पुण्यात आले आहेत. पुण्यातील रास्ते वाड्यात त्यांचा ८ आणि ९ जूनला मुक्काम आहे. त्यानंतर अश्व १० जूनला पहाटे आळंदीकडे प्रस्थान ठेवतील. पुणे-आळंदी मार्गावरील बिडकर वाड्यात (श्रीकृष्ण मंदिर) सरदकर अर्पितसिंह बिडकर परिवाराच्या वतीने अश्वांचे स्वागत केले जाते. येरवड, थोरल्या पादुकामार्गे अश्व आळंदीत पोचतील. त्यानंतर परंपरेनुसार ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या वतीने दिंडीचे मालक आणि आळंदी देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. महादजी शितोळे सरकार यांनी सांगितले की, वारीकाळात अश्वांच्या सुरक्षिततेसाठी विसाव्याच्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स असावेत. ऊन-पावसापासून संरक्षणासाठी त्यांचे तंबू योग्य ठिकाणी छतांसह असावेत, यासाठी शासनाने काही सोय करावी, अशी सरकारकडे मागणी केली आहे.
रिंगण सोहळा
सोहळ्यात रिंगण सोहळ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. पुरंदवडीत पहिले, खुडूस फाटा येथे दुसरे, ठाकूरबुवांची समाधी येथे तिसरे आणि बाजीराव विहिर येथे गोल रिंगण पार पडेल. यानंतर लोणंद, भंडी शेगाव आणि वाखरीत उभे रिंगण पार पडणार आहे.