कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करावे !
हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे मागणी !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्या पराक्रमामुळेच महाराष्ट्राचे आणि हिंदूंचे अस्तित्व टिकून आहे. केवळ महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवरायांना एक आदर्श शासनकर्ता मानले जाते. त्यामुळे त्यांच्याविषयी आदर असलेला कुणीही आणि कधीही त्यांच्या नावाचा उल्लेख एकेरी करत नाही. असे असतांना महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या विख्यात विद्यापिठाच्या नावात महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापिठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ जून या दिवशी माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही समितीच्या वतीने या मागणीचे निवेदन दिले आहे.
याविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की,
१. यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज भोसले, आमदार उद्धव ठाकरे, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विद्यापिठाचे नाव पालटण्यासाठी प्रयत्न केले होते. माननीय राज्यपालांनाही यापूर्वी नामांतरासाठी निवेदन देण्यात आले आहे; परंतु अद्यापही शिवाजी विद्यापिठाचे नामांतरण करण्यात आलेले नाही.
२. ‘छत्रपती’ ही संस्कृत भाषेतील शाही पदवी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये राज्याभिषेक झालेल्या हिंदु राजाच्या नावाआधी ही उपाधी लावली जाते. ‘छत्रपती’ म्हणजे प्रजेवर सतत मायेचे छत्र धारण करणारा, सदैव प्रजेला साहाय्य करणारा, प्रजेचे दु:ख समजून घेऊन ते दूर करणारा, प्रजेचे संरक्षण, पालनपोषण यांचे दायित्व घेऊन प्रजेची कुटुंबाप्रमाणे काळजी घेणारा प्रजाहितदक्ष राजा होय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनीही एका अभंगामध्ये ‘शिव तुझे नाव । ठेविले पवित्र। छत्रपती सूत्र । विश्वाचे की’ अशा प्रकारे शिवरायांचा ‘छत्रपती’ उल्लेख केला आहे.
३. मुळात आधीच छत्रपती शिवरायांचे नाव असलेल्या विद्यापिठाच्या नावात केवळ आदरार्थी उल्लेख करण्याचे सूत्र असूनही त्याला इतका विलंब का होत आहे ?
४. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात साम्यवाद्यांना मोठी धन्यता वाटते’, असे आतापर्यंतच्या विविध प्रसंगातून लक्षात आले आहे. कॉ. गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकामध्ये महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. हिंदवी साम्राज्य निर्माण करणार्या हिंदुहृदयसम्राटाचा उल्लेख आदरार्थी कसा करावा ?, अशी साम्यवादी विचारसरणी यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
५. पुरोगामित्वाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख एकेरी करणे, सातत्याने मागणी होऊनही विद्यापिठाच्या नावात महाराजांचा आदरार्थी उल्लेख न करणे यामागे षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून शिवाजी विद्यापिठाचे नामकरण त्वरित ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे करण्यात यावे आणि छत्रपती शिवरायांच्या नावाला साजेल असे राष्ट्रनिष्ठेचे धडे या विद्यापिठात देण्यात यावेत. याचा प्रारंभ ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ या नामकरणातून व्हावा.
संपादकीय भूमिकावास्तविक अशी मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारने स्वतःहून असे होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते ! |