क्रूरकर्मा औरंगजेबाचा उदो-उदो तात्काळ थांबवा ! – नितीन शिंदे, माजी आमदार
कोल्हापूर येथे तणावपूर्ण शांतता : जनजीवन सुरळीत !
सांगली – ज्या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे ४० दिवस हाल करून त्यांची हत्या केली, देशातल्या हिंदूंची मंदिरे फोडली, हिंदु महिलांवर अत्याचार केले, त्या औरंगजेबाचा उदो-उदो तात्काळ थांबवावा. असे न झाल्यास ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर अफजलखानाला फाडलेले चित्र महाराष्ट्रभर नाचवू, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्याजवळ नमाजपठण आणि नतमस्तक होण्यावर बंदी घालावी जेणेकरून त्याचे उदात्तीकरण होणार नाही, अशीही मागणी श्री. शिंदे यांनी केली आहे.
कोल्हापूर, ८ जून (वार्ता.) – कोल्हापूर येथे ७ जून या दिवशी पुकारण्यात आलेला बंद आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आता निवळली आहे. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून सर्व व्यवहार चालू असून जनजीवन सुरळीत झाले आहे. झालेल्या घटनांचे अफवांमध्ये रुपांतर होऊ नये; म्हणून प्रशासनाच्या वतीने ८ जूनच्या रात्री १२ पर्यंत मायाजाळ (इंटरनेट) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत असून सध्या अनेक व्यवहार हे ‘फोन पे’, ‘गूगल पे’ या माध्यमातूनच होत असल्याने लोकांना आर्थिक व्यवहार करतांना मोठ्या अडचणी येत आहेत. विशेष करून रुग्णांमध्ये आर्थिक व्यवहार करतांना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी रक्कम भरायची कशी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.