हिंदूंचा उद्रेक !
६ आणि ७ जून या दिवशी कोल्हापूरसारख्या शहरात हिंदूंच्या संघटनातून झालेले कृतीशील एकत्रीकरण अनेक दृष्ट्या महत्त्वपूर्ण म्हणावे लागेल. या घटनेतून जनता, प्रशासन, शासन, तसेच विरोधी पक्ष आणि धर्मांध या सर्वांनीच धडा घ्यायला हवा. एक गोष्ट यातून स्पष्ट झाली, ती म्हणजे केवळ शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकदिनी धर्मांधांनी औरंगजेब किंवा टिपू सुलतान यांचे ‘स्टेटस’ ठेवले, या एका घटनेमुळे हे सहस्रो हिंदू एकत्र आले नाहीत, तर गेले अनेक दिवस कोल्हापूरच्या आजूबाजूच्या गावांत एकापाठोपाठ एक हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर, त्यांच्यावर आघात करणार्या घटना, तसेच राज्यभर घडत असणार्या तत्सम घटना या त्यासाठी कारणीभूत आहेत. कोल्हापूरच्या आजूबाजूच्या गावांमध्ये राष्ट्रपुरुषांची विटंबना करण्याचे प्रकार काही दिवस घडत होते. बंदी असूनही जेव्हा सहस्रो सहिष्णु हिंदू रस्त्यावर उतरतात, तेव्हा ‘त्यांच्या जिव्हारी किती लागले आहे’, हे पोलीस प्रशासन आणि शासन यांनी समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात, त्याप्रमाणे ‘स्टेटस’च्या १-२ घटनांमुळे हिंदु रस्त्यावर उतरले आहेत’, असे नव्हे. हिंदूंवरील आघातांच्या अनेक घटना घडत असल्याने ‘आता डोक्यावरून पाणी जात आहे’, असे हिंदूंना आतून वाटत आहे.
पोलिसांची निष्क्रीयता
गेले काही दिवस कोल्हापूरच्या आजूबाजूच्या गावांत हिंदुद्वेषी घटना घडूनही पोलिसांनी त्याकडे अपेक्षित असे गांभीर्याने लक्ष दिले नाही. कारवाई करण्यास दिरंगाई केली किंवा ती विलंबाने केली. नुकतीच पन्हाळा येथे तुरबतीची (मुसलमानांच्या थडग्याची) तोडफोड केल्याप्रकरणी २ हिंदु तरुणांना अटक करून त्यांच्यावर गंभीर कलमे लावली आणि हिंदुत्वनिष्ठांनाही त्यांना भेटू दिले नाही. २ मासांपूर्वी लव्ह जिहाद प्रकरणी तक्रार प्रविष्ट करूनही १ मास मुलीचा शोध घेण्यास टाळाटाळ करणार्या पोलिसांनी भाजपचे आमदार नितेश राणे कोल्हापुरात आल्यावर १ दिवसात मुलीला शोधले. हिंदूंच्या संदर्भात पोलीस किती असंवेदनशील आहेत, याचे हे गंभीर उदाहरण आहे. या जागी त्या पोलिसांच्या घरची मुलगी असती, तर ते असेच वागले असते का ? नुकत्याच घडलेल्या अन्य एका लव्ह जिहादच्या प्रकरणात मुलीच्या आईला दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवून तक्रार प्रविष्ट करून घेतली नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना पोलीस ठाण्यात यावे लागले. औरंगजेब आणि टिपू यांचे ‘स्टेटस’ ठेवल्याच्या प्रकरणीही हिंदुत्वनिष्ठ तक्रार प्रविष्ट करायला गेले असता त्यांना ६ जूनला पोलीस ठाण्यात ३-४ घंटे बसवून ठेवले. ७ जून या दिवशी पोलिसांनी ३० हिंदुत्वनिष्ठांसह २०० हिंदूंवर गुन्हे नोंद केले आहेत. हिंदूंची श्रद्धास्थाने आणि त्यांच्यावरील आघातांविषयी गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ करणे अन् हिंदूंनी त्या आघातांविषयी कुठलीही प्रतिक्रिया दिली की; मात्र त्यांच्यावर जेवढ्या तत्परतेने होतील, तेवढे गुन्हे नोंद करणे आणि त्यांना लाठीमार करणे पोलिसांना सहज शक्य होते. ‘आपणही याच हिंदु समाजातून आलो आहोत आणि धर्मांधांच्या दृष्टीने आपणही काफीर आहोत’, हे पोलीस का विसरतात ?’, ते लक्षात येत नाही. मुसलमानांवर गुन्हे नोंद करण्याविषयी पोलीस प्रशासनावर असणारा दबाव आणि काँग्रेसच्या काळापासून त्यांच्यावर झालेला कुसंस्कार यांमुळे ‘मुसलमानावर गुन्हा नोंदवला, तर लगेच हिंदूवरही तो नोंदवायला हवा’, असा दंडकच जणू त्यांनी घालून घेतला आहे. त्याचा इतका अतिरेक झाला आहे की, मानवत (परभणी) येथे छेड काढणार्या धर्मांधासमवेत त्याला विरोध करणार्या हिंदु मुलीवरही ५ जून या दिवशी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यामुळे ‘पोलीस प्रशासनाचा हिंदुत्वनिष्ठांप्रती असणारा हा सापत्नभाव हिंदूंनी एकत्र येण्याला किती टक्के कारणीभूत आहे’, याचाही साकल्याने अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदूंवर लाठीमार आणि अश्रूधूर सोडणे हे पोलिसांनी का केले ? तर हिंदुत्वनिष्ठ ‘अटक केलेल्या हिंदु तरुणांना सोडा’, अशी मागणी करत होते म्हणून. त्यामुळेच हिंदूंचे शासन असूनही ‘हिंदूंना न्याय मिळत नाही’, अशी एक तीव्र भावना हिंदुत्वनिष्ठांच्या मनामध्ये आहे, याविषयी शंका नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मांधप्रेम
संभाजीनगर, मालाड, मालवणी, अकोला, अहिल्यानगर, शेवगाव या सर्व ठिकाणी गेल्या काही दिवसांत घडलेल्या दंगली या धर्मांध मुसलमानांनी चालू केल्या होत्या, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ठाऊक नाही का ? त्यासाठी ‘ते शासनाला उत्तरदायी ठरवत आहेत’, हे शासनानेही लक्षात घेतले पाहिजे. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठ आणि विरोधी पक्ष दोन्ही बाजूंकडून शासन अन् प्रशासन यांना बोल लावले जात आहेत. यातून शिकून शासन आणि प्रशासन यांनी वेळीच धर्मांधांवर कडक कारवाई केली, तर पुढील संभाव्य दंगलीही टळतील अन् हिंदूंनाही न्याय मिळाल्याचे समाधान वाटेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुढील काळात ‘आपण धर्माच्या बाजूने उभे राहिलो’, याचे समाधान पोलिसांना मिळेल.
मुसलमानांचे नक्राश्रू
‘हिंदुद्वेषी स्टेटस ठेवणारे सर्व धर्मांध अल्पवयीन कसे ?’, हाही एक प्रश्न या घटनेतून समोर येत आहे. यावरून त्यांचा धूर्तपणा आणि पूर्वनियोजन यांची कल्पना येते. कोल्हापूर प्रकरणी तेथील स्थानिक मुसलमान हे सर्व गोष्टींसाठी हिंदूंनाच उत्तदारयी धरत असून एवढे सगळे झाल्यानंतर ‘स्टेटस’ प्रकरणी त्यांनी निषेध नोंदवला होता’, असे नक्राश्रूही ते ढाळत आहेत. प्रत्यक्षात त्यांनी तसे काहीही केलेले नव्हते. कोल्हापूरमध्ये हिंदूंचे संघटन चांगले असल्याने तिथे धर्मांध अधिक काही करू शकत नाहीत. ‘हिंदूंवर आघात झाला, तर हिंदू एकत्र येऊ शकतात’, हा धडा या घटनेमुळे सर्वांना मिळाला आहे. सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घेतला पाहिजे आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठांनी आपापल्या ठिकाणचे संघटन कसे बळकट होईल, यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे !
भारतभरातील हिंदुद्वेषी घटनांतून बोध घेऊन सर्वत्रच्या हिंदूंनी त्यांचे संघटन बळकट करावे ! |