कोल्‍हापूर येथे शांतता समितीच्‍या बैठकीत हिंदुत्‍वनिष्‍ठांना दोषी ठरवणार्‍या मेघा पानसरे यांना हिंदुत्‍वनिष्‍ठांनी रोखले !

मेघा पानसरे

कोल्‍हापूर – कोल्‍हापूर येथे ७ जून या दिवशी झालेल्‍या घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे शांतता समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही हिंदुत्‍वनिष्‍ठांनी गेल्‍या एक मासापासून आणि चालू आठवड्यात जिल्‍ह्यात घडलेल्‍या घटनांची वस्‍तूस्‍थिती मांडली. असे असतांना या बैठकीत मेघा पानसरे यांनी ‘यापूर्वी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने जाणीवपूर्वक शहरात मोर्चा काढण्‍यात आला, ‘द केरल स्‍टोरी’ची विनामूल्‍य तिकिटे वाटण्‍यात आली, ‘लव्‍ह जिहाद’च्‍या संदर्भात घटनांची आकडेवारी पोलीस प्रशासनाकडे मागितली असता हिंदु-मुसलमान अशी आकडेवारी त्‍यांच्‍याकडे नाही, जसे हिंदु युवती मुसलमान युवकाशी विवाह करतात, तसे मुसलमान युवतीही हिंदु युवकांशी विवाह करतात’, अशी एकतर्फी आणि विविध घटनांद्वारे हिंदुत्‍वनिष्‍ठांनाच दोषी ठरवणारी माहिती देण्‍याचा प्रयत्न केला; मात्र ही सर्व माहिती एकतर्फी असल्‍याने बैठकीसाठी उपस्‍थित असणार्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांनी मेघा पानसरे यांना तात्‍काळ पुढे बोलण्‍यापासून रोखले. यानंतर गदारोळ झाल्‍याने पालकमंत्र्यांनी ध्‍वनीवर्धकाचा ताबा घेऊन मेघा पानसरे यांना खाली बसण्‍यास सांगितले, अशी माहिती हिंदुत्‍वनिष्‍ठांनी पत्रकारांना दिली.