तामसवाडी (नेवासा) गावात दर्ग्याच्या उत्खननात सापडले नंदी, तसेच हिंदु मंदिरांंचे अवशेष
दर्ग्याच्या जागी महादेवाचे मंदिर असल्याचे १०४ वर्षांच्या दगडू कर्जुले यांचे म्हणणे !
नेवासा (जिल्हा अहिल्यानगर) – येथील तामसवाडी गावात सय्यदबाबा दर्ग्याचा जीर्णोद्धार म्हणून चालू केलेल्या खोदकामात
मंदिराचे घडीव दगड,भग्नावस्थेतील नंदी, मंदिराचे खांब सापडले आहेत. या ठिकाणी पूर्वी महादेवाचे मंदिर होते, असे १०४ वर्षांचे वयोवृद्ध ग्रामस्थ दगडू कर्जुले यांनी सांगितले. तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत हिंदु-मुसलमान ग्रामस्थांनी पुरातत्व विभागाचा निर्णय मान्य करणार असल्याचा निर्णय दिला आहे.
ग्रामपंचायत समिती आणि मुसलमान ग्रामस्थांच्या विचारातून सय्यदबाबा दर्ग्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेसीबीने खड्डे काढण्यास चालू केले असता चौथा, पाचवा खड्डा घेत असतांना ८ फुटांवर काही घडीव दगड आढळताच उपस्थित ग्रामस्थांनी काम बंद ठेवून प्रशासनास माहिती दिली. नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार आणि पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. बैठकीत आहे त्या स्थितीत काम बंद ठेवून पुरातत्त्व विभागाचा निर्णय सर्वमान्य राहील, असा निर्णय हिंदु-मुसलमान ग्रामस्थांनी घेतला. या वेळी सरपंच चंद्रकांत जगताप, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संभाजी जगताप, बबन फोफसे, अजिम शेख आदी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी सांगितले की, तहसीलदारांच्या उपस्थितीत खोदकामाची पहाणी केली. हिंदु-मुसलमान समाजातील प्रमुखांची बैठक घेतली असता सापडलेले दगड पुरातत्त्व विभागास दाखवून त्यांचा निर्णय मान्य करू, असे दोन्ही समाजांनी सांगितल्याने तसा अहवाल वरिष्ठांना दिला जाईल.
(नंदीच्या भग्न मूर्तीवरून त्या ठिकाणी महादेवाचे मंदिर होते हे सांगण्यासाठी पुरातत्व विभागाची आवश्यकता का हवी ? आज अनेक दर्ग्यांखाली हीच परिस्थिती आहे. भारतातील सहस्रो मंदिरे तोडून इस्लामी आक्रमकांनी त्या ठिकाणी मशिदी उभारल्या आहेत. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत. जिथे जिथे मंदिर तोडून मशीद बांधली, तेथे पुन्हा मंदिर उभारले गेले पाहिजे, असेच सामान्य जनतेला वाटते ! – संपादक)